राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
कुरखेडा :- काँग्रेस कमिटी कुरखेडा यांच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत विविध पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली. या वेळी आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीची तयारी, पक्ष संघटन बळकट करणे, स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आमदार मसराम यांनी कार्यकर्त्यांना “जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणे हेच खरे राजकारण असून, पक्षाच्या विचारधारेवर ठाम राहून संघटितपणे काम केले पाहिजे” असे स्पष्ट केले.
तसेच आमदार रामदास मसराम यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष असून, लोकहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकीत काँग्रेस विजय मिळवेल.”
या बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, जयंत हरडे, नंदुभाऊ नरोटे, ज्येष्ठ नेते आनंदराव जांभूळकर, मुज्फर शेठ बारी, महिला तालुकाध्यक्ष व नगरसेवक आशाताई तुलावी, माजी जिल्हा परिषद सदस्य संध्याताई नैताम, नगरसेवक प्राचीताई धोंडणे, नगरसेवक हेमलता नंदेश्वर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष जयश्रीताई धाबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष प्रवेशामुळे कुरखेडा तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.



