Home Maharashtra संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आळंदीत सर्वपक्षीय निषेध…

संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आळंदीत सर्वपक्षीय निषेध…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : प्रखर हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. “आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका” असे वक्तव्य करणारा त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी महाद्वार चौकात एकत्र येऊन भंडारे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.

         निषेध सभेला माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव गोगावले, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.मनोज राका, माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, नंदकुमार वडगांवकर, विलास कुऱ्हाडे, संदीप नाईकरे पाटील, प्रकाश घुंडरे, सौरभ गव्हाणे, सतीषबापू कुऱ्हाडे, सागर रानवडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश आरु, संजय वडगांवकर, माऊली घुंडरे, प्रसाद बोराटे, महेश‌ कुऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

         सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, भंडारे यांच्या विधानामुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण झाला असून जबाबदारीच्या भूमिकेतून केलेले असे वक्तव्य अयोग्य आणि संतापजनक आहे. याबाबत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी आळंदी पोलीस स्टेशनकडे करण्यात आली आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.