धर्म आणि अधर्म असे म्हणताना धर्म म्हणजे नैतिकता पाळणे आणि अधर्म म्हणजे अनैतिकतेचे वर्तन करणे असेच म्हणतो,पण या म्हणण्यानुसार मूठभर लोक सोडले तर धर्माचे आचरण कुणीच करताना दिसत नाहीत.सारेच इतरांशी व्यवहार करताना किंवा उद्योग व्यवसाय प्रपंच करताना खोटे बोलणे,इतरांचे मन दुखेल असे बोलणे,इतरांना सहकार्य न करणे,त्याच्या संकटसमयी धाऊन न जाणे,दुरूनच तमाशा पाहणे,अडचणीत संकटात सापडलेल्यास मदत न करणे,इतरांची चोरी करणे,शोषण पिळवणूक करणे,अन्याय अत्याचार बलात्कार महागाई काळाबाजार साठेबाजी भ्रष्टाचार हिंसा या अनैतिक गोष्टी बरीच माणसे सहजपणे करीत असतात,याचे त्यांना अनीती अधर्म असे काहीच वाटत नाही,पंचशीलाचे पालन करीत नाहीत,परोपकारच्या देवाच्या धर्माच्या नावाखाली पण पापे करीत असतात,देवाचे नावाने व्यवसाय करतात.एव्हढेच नाही तर देवाच्या मूर्तींचा सर्हस विक्री आणि फोटोंचा जाहिरातीसाठी उपयोग करीत असतात,असे असेल तर धर्म राहिला कुठे ? धर्माचे मूळ म्हणजे दया क्षमा शांती तसेच धर्माचे आचरण म्हणजे सत्य न्याय निती या दोन्ही गोष्टीचे पालन धार्मिक लोक किंवा भक्तजन करीत नाहीत.आणि 90 टक्के जनता तर धार्मिकच आहे.ज्यांचा व्यवहार धर्मास धरून नाही,तर अधर्मास धरून चालतो.असे असेल तर मग धर्माची गरज काय ? नको हा अधर्म.असला धर्म.
धर्म म्हणजे नीतिमत्ता असे न मानता कर्मकांडासच लोक धर्म असे म्हणतात.जसे की,निर्जीव देवाची मूर्ती,त्याचा भोवती चारभिंतीचे देऊळ,म्हणजे देवाचे घर.त्यास दार कडी कुलूप.कारण तो शिवाशिव पाळीत असावा,किंवा त्याला चोराची भीती असावी,म्हणून कडी कुलूप.त्याची पूजा,आराधना, भजन,पूजन, आरती,धूप अंगारा, नवस सायास,भंडारे,आनंदान ,रक्तदान, मोक्ष मिळवा म्हणून बरेच काही पुण्यकर्म,फुलांचे हार,फुलांची उधळण , तीर्थाटन, गंगाजल, पोथी पुराण,सत्संग, प्रवचन,कीर्तन, भजन पूजन, गुरु करणे,त्यास दक्षिणा देणे,मठ बांधून देणे,मठाला, देवस्थान ला जमीन,पैसे,सोने,अन्न , गायदान, मुले मुली मठावर सोडणे हा सारा प्रकार म्हणजे कर्मकांड होय.यात नैतिकतेचा विषयच नसतो,उलट या कर्मकांडातून अनैतिकता,आर्थिक शोषण,आणि चुकीचे मार्गदर्शन घडत असते.यास म्हणतात ” पुण्य करायला गेलो आणि पाप घडले ” परोपकार,सहकार्य,सहयोग,परिवर्तन ,जागृती,अंधश्रद्ध निर्मूलन अशी कर्मे म्हणजे पुण्यकर्म होय,गाडगे महाराज्यांच्या विचारानुसार अभावग्रस्तांचा अभाव कमतरता कमी करणे म्हणजे च ” परोपकार करणे,म्हणजेच पुण्य कर्म होय.” परोपकारी पुण्य.पुण्यानुबंध पुण्य होय.आणि अधर्म करणे ,कर्मकांड करणे म्हणजेच पुण्यानुबंध पाप होय.म्हणजेच पुण्य करायला गेले अन पाप झाले.
सारांश,धर्म म्हणजे कर्मकांड नसून नैतिकता आहे.जी व्यवहारात पाळणे शक्य असते आणि नसतेपण.जे नीतीनियम पाळणे शक्य आहेत ते न पाळणे म्हणजे अधर्म होय.आणि जे नीतीनियम व्यवहारात ईछा असूनही भौतिक परिस्थितीमुळे पाळता येत नाहीत ,असे नीतीनियम न पाळणे म्हणजे अधर्म होऊ शकत नाही.याचा अर्थ ठरवून केलेले पापकर्म हा अधर्म होय.आणि न ठरविता आपोआप घडते,किंवा करावेच लागते असे पाप म्हणजे अधर्म होऊ शकत नाही,असेच म्हणावे लागते.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक : 21 मे 2025. फोन : 9420912209.



