शिवछत्रपतींवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट, मालिका तयार केली पाहिजे : खासदार डाॅ.अमोल कोल्हे… — विश्वास पाटील यांच्या ‘रणखैंदळ’ या कादंबरीचे डॉ.कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे: कादंबरी, नाटकं, महानाट्य, मालिका, चित्रपट यातून इतिहास आपल्यासमोर यायला हवा. शिवचरित्र हे केवळ सात घटनांपुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती खूप माेठी आहे. शिवचरित्रातून समाजमनाची बांधणी व्यवस्थित झाली तर त्यावर कुठल्याही आघाताचा काहीही परिणाम हाेणार नाही. इतिहासामुळे आत्मभान येते, तसेच आपला स्वाभिमान जागृत हाेताे आणि त्यातून राष्ट्राची निर्मित्ती हाेत असते. इतिहासाची डाेळसपणे चिकित्सा झाली पाहिजे. शिवछत्रपतींवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट, मालिका तयार केली पाहिजे, असे मत अभिनेते खासदार डाॅ.अमाेल काेल्हे यांनी व्यक्त केले.

 

कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या महासम्राट या कादंबरी मालिकेच्या ‘रणखैंदळ’ या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन डाॅ. काेल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेहता पब्लिशिंग हाउसचे अखिल मेहता उपस्थित हाेते.

इतिहासाकडे चिकित्सक वृत्तीने बघण्याची सवय लावून घ्यावी.विचारधारेला प्रश्न विचारले नाहीत तर मेंढराचे कळप तयार हाेतात आणि व्यवस्थेला प्रश्न विचारले नाहीत तर अंधभक्ताच्या फाैजा तयार हाेतात.आपल्याला ‘गेम ऑफ थ्रोन’ बद्दल माहीत आहे. पण जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज आपण पोचवू शकलो नाही, याची खंत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. छत्रपतींची शौर्यगाथा वेब सिरीजच्या माध्यमातून मांडण्यासाठी महासम्राट कादंबरीची मालिका उत्तम सशक्त पटकथा आहे. आपण नक्कीच मिळून यावर काहीतरी करूयात, अशा मानस डॉ.कोल्हे यांनी व्यक्त केला.

 

पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि काळजाचा विषय आहे. त्यामुळे ही कादंबरी लिहीत आहे. मला संशाेधन मांडायचे हाेते; पण जनसामान्यांसाठी कादंबरी लिहित आहे. माझी ही कादंबरी आचार्य अत्रे यांना अर्पण करीत आहे. कर्नाटकात शहाजी महाराजांची विदीर्ण अवस्थेतील समाधी पाहून महाराष्ट्रात भूकंप हाेईल, असे वाटले हाेते. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली. नेताजी पालकर यांच्यावर महानाट्य लिहून तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.