थ्रिलर मध्ये अभिनय करणे हेही आव्हानात्मक थ्रील. :- अभिनेता गिरीश परदेशी… — महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवन वास्तवावर प्रकाश टाकणारा दीर्घांक….

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक जीवन वास्तवावर प्रकाश टाकणारा ‘तो’ शेवटचा दिवस हा दीर्घांक रंगभूमीवर येत असून पुण्यात अक्षय तृतीयेला सायंकाळी संहिता पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘माय स्टेज’ या निर्मिती संस्थेतर्फे या दीर्घांकाची निर्मिती करण्यात येत असून लेखन दिग्दर्शन विनिता पिंपळखरे यांचे आहे. संहिता पूजन कार्यक्रमासाठी संगीतकार अविनाश – विश्वजित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

 

या नव्या दिर्घाकाच्या संहितेचे पूजन, तालमीचा प्रारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर,२२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हॉटेल किमया सभागृह, कर्वे रस्ता (पुणे) येथे झाला. मे महिन्यामध्ये रसिकांच्या भेटीला हा दीर्घांक येणार असून राज्यभर त्याचे प्रयोग होणार असल्याची माहिती निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांनी दिली. गिरीश परदेशी,प्रज्ञा गुरव,प्रशांत घैसास,योगिनी गोखले, नितीन पारेगावकर हे कलाकार या दीर्घांकामध्ये काम करणार आहेत.सुरेंद्र गोखले हे या दीर्घांकाचे सूत्रधार आहेत.

 

उत्कंठा वाढविणारा सस्पेन्स थ्रिलर

 

महिला पोलीस अधिकाऱ्याकडे त्यांच्या कारकिर्दीत २५ वर्षांपूर्वीच्या कोडे बनून राहिलेल्या गुन्ह्यासंबंधी अचानक नवी माहिती मिळते. तपास सुरू होतो आणि ‘तो शेवटचा दिवस’ या दीर्घांकाचा उत्कंठावर्धक थरारक प्रवास उलगडू लागतो. ‘महिला पोलीस अधिकाऱ्याच्या जीवन वास्तवाशी संबंधित थ्रिलर,क्राईम स्टोरी प्रथमच रंगमंचावर येत आहे’,असे लेखिका विनिता पिंपळखरे यांनी सांगितले. त्यातून महिला तपास अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक जीवन वास्तवाचे दर्शन रसिकांना घडणार आहे,असे त्यांनी सांगितले.

 

 ‘वेगळ्या निर्मितीचे आव्हान म्हणून आम्ही या दीर्घांकाकडे पाहत असून वास्तववादी निर्मितीचा वस्तुपाठ आम्ही समोर आणणार आहोत’,असे निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांनी सांगितले.

 

गिरीश परदेशी म्हणाले ‘या दीर्घाकाचे कथानक उत्कंठा वाढविणारे आहे. या थ्रिलर प्रकारचा जॉनर मी बऱ्याच दिवसांनी हाताळत आहे. मलाही या निर्मितीची उत्सुकता आहे. थ्रिलर मध्ये काम करणे हेही आव्हानात्मक थ्रील आहे.’ माय स्टेज ‘ ची निर्मिति अतिशय दर्जेदार,भक्कम असते.चांगला संच या निमित्ताने एकत्र आला आहे.त्यामुळे ही निर्मिती गाजणार यात शंका नाही. संगीतकार अविनाश – अभिजीत,ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रवीण वानखेडे यांच्यासह नाट्यचित्रसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.