भारतीय संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या,”प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भारत सरकारला,”महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,यांनी तात्काळ बरखास्त केले पाहिजे..

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

       भारताची सार्वभौमता,एकता व एकात्मता उन्नत ठेवण्यास व त्यांचे संरक्षण करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे केंद्रीय सरकार अपयशी ठरले असल्यामुळे व भारतीय संविधानातंर्गत मुलभूत अधिकार अनुच्छेद ५१ चे उल्लंघन केल्यामुळे भारतच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकार तात्काळ बरखास्त केले पाहिजे.

          मुलभूत कर्तव्ये अंतर्गत अनुच्छेद ५१ नुसार धार्मिक,भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे,स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे केंद्र सरकारचे अग्रगण्य कर्तव्य असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार धर्मांधतेला बढावा स्वतःहून देत असल्याचे अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून लक्षात येते आहे व प्राणप्रतिष्ठा सारख्या काल्पनिक मान्यतेला मान्य करून त्याचा प्रचार व प्रसार केंद्र सरकार करीत असल्याचे स्पष्ट आहे.

             यामुळे भारतीय संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या केंद्र सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार राहिलेला नाही‌.

         तद्वतच विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन,मानवतावाद आणि शोधकबुध्दी व सुधारणावाद यांचा विकास करण्याची केंद्र सरकारवर जबाबदारी असतांना तेच सरकार रुढी परंपरावादी आधारहिन काल्पनिक व असत्यावर आधारलेल्या वादाला प्रोत्साहन देऊन या देशातील नागरिकांना बौध्दिक पंगू करीत आहे आणि मानसिक गुलाम करीत आहे.

           याचबरोबर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मोल जाणून त्यांचे जतन करणे आणि प्रत्येक प्राणिमात्रांच्या बाबत दया-बुध्दी बाळगणे हे केंद्र सरकारचे आद्य कर्तव्य असताना असे कर्तव्य केंद्र सरकारकडून अजिबात होतांना दिसत नाही.

        एवढेच काय तर संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था,राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे.तद्वतच ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फुर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासणा करून त्यांचे अनुसरण करणे हे परम दायित्व केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे आहे.

        वरील सर्व प्रकारच्या कर्तव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारने हरताळ फासले असून अशा सरकारला महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संरक्षण कसे काय आहे?

          केंद्र सरकार व राज्य सरकार बरोबर देशातील नागरिकांनी वरील सर्व प्रकारचे कर्तव्य पार पाडले पाहिजे असे अनुच्छेद ५१ अंतर्गत मुलभूत कर्तव्ये सांगतो आहे.

         केंद्र सरकार व राज्य सरकारे,देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व संवर्धनासाठी अनुच्छेद ५१ नुसार कर्तव्य पार पाडत नसतील तर देशातील नागरिकांनी अशा सरकारला त्यांची जागा दाखवणे शिकले पाहिजे.

           ज्या संविधानातंर्गत प्रधानमंत्री झाले त्याच भारत देशाच्या संविधानाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या व देशातील सर्व नागरिकांच्या स्वाभिमानाचे आणि आत्मसन्मानाचे नेहमी हनन करणाऱ्या केंद्र सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

      म्हणूनच महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तात्काळ भारताच्या केंद्र सरकारला बरखास्त केले पाहिजे.