Home Social भटक्या जनावरांचा वाढता उपद्रव; मानव – श्वान संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज...

भटक्या जनावरांचा वाढता उपद्रव; मानव – श्वान संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज :- प्रा.डॉ.जितेंद्र कुमार ठाकुर… 

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

आजच्या शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या काळात भटक्या जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरेढोरे, कुत्री, डुकरे आदी जनावरे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करत असून, विशेषतः मानव–श्वान संघर्ष ही ज्वलंत सामाजिक समस्या बनली आहे.

         शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतूक अपघातांचे प्रमाण वाढले असून, यामध्ये जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या प्राणघातक आजारांचा धोका वाढत आहे. कचऱ्यात अन्न शोधताना ही जनावरे कचरा पसरवतात, त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन रोगराई पसरण्याची शक्यता वाढते. या परिस्थितीमुळे लहान मुले, वृद्ध व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मोकाट जनावरांमुळे शेती पिकांचे व खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

         मानव–श्वान संघर्षामागे अन्नाची कमतरता, कचऱ्यावर अवलंबित्व, अनियंत्रित प्रजनन, काही नागरिकांकडून होणारी मारहाण किंवा छळ तसेच योग्य नियोजन व जनजागृतीचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

          या पार्श्वभूमीवर मानव–श्वान संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित नसबंदी कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. रेबीजसह इतर आजारांपासून संरक्षणासाठी कुत्र्यांचे वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. उघड्या कचऱ्यावर नियंत्रण ठेवून प्रभावी कचरा व्यवस्थापन केल्यास भटक्या जनावरांचे प्रमाण कमी होऊ शकते. जखमी, आजारी व आक्रमक जनावरांसाठी स्वतंत्र पुनर्वसन व निवारा केंद्रांची उभारणी करणेही काळाची गरज आहे.

           तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करून भटक्या कुत्र्यांशी कसे वागावे, त्यांना त्रास न देता सुरक्षित अंतर कसे राखावे याबाबत मार्गदर्शन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नगर परिषद ठोस धोरणे आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांच्यात समन्वय साधल्यास या समस्येवर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल.

         भटक्या जनावरांचा उपद्रव व मानव–श्वान संघर्ष ही केवळ प्रशासकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारीची बाब आहे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून, शास्त्रीय पद्धतीने आणि सामूहिक प्रयत्नांतून उपाययोजना केल्यास सुरक्षित, स्वच्छ व सुसंस्कृत समाज निर्माण करणे शक्य होईल.