दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 पूर्वी प्रभाग क्रमांक २ मध्ये मोठी राजकीय हालचाल झाली आहे. अर्ज छाननीनंतर अधिकृत माघार प्रक्रियेदरम्यान प्रभाग २अ मधील ज्ञानेश्वरी उमरगेकर व ऋतुजा रंधवे, तर प्रभाग २ब मध्ये अभिषेक भोसले या तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २ मधील लढत आणखी रोचक बनली असून येथील निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
प्रभाग २अ : वैजयंता उमरगेकर यांच्या विरुद्ध नेटके कुटुंबातील तीन उमेदवार
प्रभाग २अ मधून माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर भाजपाच्यावतीने पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनुपमा नेटके, शिवसेना (उबाठा) कडून सोनू नेटके, तर अपक्ष स्वरूपात योगिता नेटके आणि सुजाता रंधवे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. उमेदवारांच्या माघारीनंतर या प्रभागात नेटके कुटुंबातील उमेदवारांचे प्रमाण वाढल्याने मतविभाजनाचा मुद्दा अधिक गडद होत असून, भाजपाची उमरगेकर यांना सरळ फायदा होण्याची चर्चा रंगू लागली आहे.
प्रभाग २ब : भोसले विरुद्ध भोसले, शिवसेनाचाही दमदार प्रवेश
प्रभाग क्रमांक 2ब मध्ये तगडी लढत निर्माण झाली आहे.
भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र भोसले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय शिवसेनेकडून संतोष भोसले, तर अपक्ष निसार सय्यद यांनीही उमेदवारी कायम ठेवत लढतीत चुरस निर्माण केली आहे. भोसले घराण्यातील तीन उमेदवारांमुळे या प्रभागातही मतविभाजन ठळकपणे दिसत असून अंतिम परिणाम अधिक अनपेक्षित होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.
निर्णायक दिवस उद्याच
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने आणखी काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही सध्याच्या घडीला प्रभाग २ मध्ये दोन्ही विभागांत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट दिसत असून मतदारांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आळंदीच्या निवडणुकीतील ही घडामोड आगामी राजकीय समीकरणांना निर्णायक दिशा देणारी ठरणार, यात शंका नाही.



