Home देशविदेश सत्ता आणि दुर्दशा…

सत्ता आणि दुर्दशा…

     दर पाच वर्षांनी निवडणुका करण्याची किंवा घेण्याची तरतूद किंवा कायदा संविधानाने केला.याचे कारण पाच वर्षापूर्वी निवडून दिलेला उमेदवाराने गेल्या निवडणुकीत जी कामे करण्याचे वचन दिले होते,त्याच्या पक्षाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता,त्याप्रमाणे कामे जर केली नाहीत तर त्या पक्षाला किंवा त्याने उभे केलेल्या जुन्या किंवा नव्या उमेदवाराला पाडणे,त्या पक्षास परत सत्तेत न पाठविणे,म्हणजेच त्याची सत्ता काढून घेणे आणि त्या ठिकाणी नवीन पक्षास किंवा नवीन उमेदवारास निवडून देणे,यासाठी दर पाच वर्षासाठी निवडणूक घेण्याचा कायदा संविधानाने केला.याचा अर्थ जनतेच्या हाती सत्तेची चाबी.मत म्हणजेच चाबी होय.

        आता आपण सत्तेची आवश्यकता काय ? हे पाहू.

   आपल्या वॉर्ड ची आणि वार्डातील मतदाराची दुर्दशा दूर करण्यासाठी,म्हणजेच आपल्या मतदारसंघाच्या भौतिक ,आर्थिक आणि सामाजिक समस्या,अडचणी,अन्याय ,अत्याचार,भ्रष्टाचार,काळाबाजार थांबवण्यासाठी नव्हे बंद करण्यासाठी,नागरी सुविधा ( पाणी रस्ते वीज शासकीय सेवा ) व्यवस्थित आणि नियमित मिळण्यासाठी,शिक्षण आरोग्य पर्यावरण या संबंधीच्या मतदारांच्या समस्या नष्ट करण्यासाठी, अंध श्रद्धेच्या नावाने जनतेची आर्थिक लूट थांबविणे,आणि शारीरिक हिंसा थांबविणे,जाती धर्मातील हिंसाचार ,भांडणे थांबविणे हे काम करण्यासाठी ,ही दुर्दशा होऊ नये म्हणून उमेदवारास निवडून द्यायचे असते,परंतु ही भौतिक आणि सामाजिक दुर्दशा थांबविण्याची ,नष्ट करण्याची ताकद त्या उमेदवारांत आहे का ? किंवा त्याच्या पक्षात आहे का ,? तसेच तो उमेदवार किंवा पक्ष हा मतदारसंघाच्या आणि त्यातील माणसांच्या समस्या सोडवण्यास समर्थ आहे की नाही ? तसेच तो कुण्या विचाराचा आहे ? सरकारी तिजोरी लुटणारा चोर आहे की तिजोरी जपणारा चौकीदार आहे ? की चौकीदार बनून जनतेची तिजोरी लुटणारा चोर आहे ? याचा विचार करूनच त्यास आपले अमूल्य मत दिले पाहिजे.चोराला सत्ता दिली तर तो चोरणाच मदत करणार,आणि शाहू माणसाला सत्ता दिली तर तो शाहूनाच मदत करणार हे लक्षात ठेवले पाहिजे.चोरांचे राज्य झाले तर दुर्दशाच होणार.

         मतदान करताना होष पाहिजे, जोश नको.मतदानात आशा पाहिजे नशा नको.पैशाची,जातीची,नात्याची,मटणाची,दारूची इत्यादी कोणत्याही प्रलोभनाची नशा करून मतदान केले तर परत पाच वर्ष आपली आणि आपल्या वॉर्डची दुर्दशा ही ठरलेलीच आहे,हे विसरता कामा नये.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मागांधी,पंडित नेहरू,सरदार पटेल,भगतसिंग, राममनोहर लोहिया,यांना भारत स्वतंत्र कशासाठी हवा होता ? हुकुमशाही नष्ट करून लोकशाही का हवी होती ? आपल्यास चांगले दिवस यावेत म्हणूनच ना? याची आठवण करूनच मतदान करायचे असते.प्रलोभनाला बळी पडून,तात्पुरत्या किंवा तात्कालिक कारण लक्षात घ्यायचे नसते,तर संतांचे,महात्म्याचे,महामानवांचे बलिदान,त्याग आणि तोही मतदारांसाठी केलेला,याची आठवण करूनच मतदान करायचे असते.

      आपणास मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग,सोडलेला संसार,दिलेली कुरबानी,भोगलेला कारागृह हे आपल्या या वेळी लक्षात येत नसेल तर आपल्या सारखे अप्पेशी , दरवेशी , अज्ञानी, अडाणी आपणच.आपण 21 व्या शतकातील विद्यानाच्या जगात नसून इसवीसन पूर्वीच्या जगात वावरत आहोत असा त्याचा अर्थ होईल.असे असेल तर आपल्या शिक्षणाचा आणि लोकशाही ज्ञान याचा उपयोग तरी काय?

     सत्ता कशासाठी ? सत्तेचे कार्य काय ? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात आणि अर्थपूर्ण द्यायचे झाल्यास सत्ता ही विषमतेसाठी नसून समता प्रस्थापित करण्यासाठी असते,आर्थिक सामाजिक विषमतेला खतपाणी घालण्याचे काम जर सत्ता ,त्यातील पक्ष आणि उमेदवार करीत असतील तर त्यांना मतदानाद्वारे तांदळाळतील खड्या प्रमाणे वेचून फेकले पाहिजे.दर पाच वर्षाला दिलेली ही संधी,हा अधिकार वापरून भारतीय संविधानाचा सन्मान केला पाहिजे,तरच आपण या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक असू,अन्यथा गुलाम आणि आपल्यात फरक तो काय ?

      लेखक : दत्ता तुमवाड 

        सत्यशोधक समाज नांदेड

   दिनांक : 19 डिसेंबर 2025, फोन : 9420912209.