शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत विविध घरकुल योजनांतील प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करण्याबाबत-प्रशासकीय स्तरावरुन संवेदनशीलपणे कर्तव्य पार पाडण्यात यावे अशी मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले पंचायत समिती चिमूर यांच्याकडे केली आहे.
चिमूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व इतर घरकुल योजनातंर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे अनुदान मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे.
शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान वेळेत वितरित करणे बंधनकारक असताना सदर बाबीकडे संबंधित यंत्रणेकडून गंभीर स्वरूपाचे प्रशासकीय दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे असे उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.
घरकुल मंजुरीनंतर अनेक लाभाथ्यर्थ्यांनी शासनाच्या अटी-शर्तीचे पालन करून बांधकाम सुरू केले आहे.काही लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले असून अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे.
मात्र,घरकुल बांधकामाचे अनुदान न मिळाल्याने मजुरी,बांधकाम साहित्य खरेदी व कर्जफेड करणे अशक्य झाले आहे.परिणामी गरीब व गरजू लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक ताणाखाली जीवन जगावे लागत आहे.
अनुदान वितरणातील या दिरंगाईमुळे शासनाच्या घरकुल योजनांचा मूळ उद्देशच धोक्यात आला असून,प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर प्रकरणात तात्काळ कार्यवाही न झाल्यास भविष्यात गंभीर प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
तरी,चिमूर तालुक्यातील विविध घरकुल योजनांतील सर्व पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तात्काळ मंजूर करून वितरित करण्यात यावे,तसेच सदर प्रकरणाची सखोल तपासणी करून विलंबास कारणीभूत असलेल्या घटकांबाबत योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. याबाबत तातडीने लेखी आदेश काढण्यात यावेत,अशी स्पष्ट मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्याल,अशी अपेक्षा उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पाठविण्यात आली आहे.



