पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध विभागाशी संबंधित नागरीकांच्या अडीअडचणी, समस्यांचे थेट निराकरण करण्याच्या उद्देशाने देसाईगंज येथे सोमवारला (दि.१८) आ. रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखातील जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबार विविध समस्यांच्या प्रश्नांनी गाजली. यावेळी जनतेच्या समस्यांना सोडवणूकीच्या कामात दिरंगाई करणा-या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात यावी व त्याबाबत सात दिवसात अवगत करण्याचे निर्देश आ. रामदास मसराम यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
देसाईगंज येथील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी, मजूर, वृद्ध, कलावंत, महिला सर्वसामान्य नागरीकांनी हजेरी लावली होती. विशेषतः तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध समस्या विधानसभा सदस्यांनसमोर मांडण्यासाठी तालुक्यातील नागरीकांनी प्रचंड उत्साहाने हजेरी लावली होती. शासनाच्या विविध विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या व प्रश्न थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडता यावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी नागरिकांनी जलजिवन मिशनच्या कामात अनियमितता, तालुक्यात आरोग्य विभागात असलेले रिक्त पद, आरोग्य विभागात अपुऱ्या सोयी, निकृस्ट दर्जाचा तांदूळ, राशन दुकानदार नागरिकांची असभ्यतेची वागणूक, संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची डिसेंबर पासून प्रलंबित असलेले प्रकरणे, अधिकाऱ्यांचा मनमानी पद्धतीच्या कारभाराप्रती नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी केल्या, शैक्षणिक समस्या, बियाणे पुरवठा, शेतकऱ्यांची विद्युत विषयक समस्या, स्मार्ट मीटर, घरकुल, सात बारा फेरफार, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्था, सावंगी गावात चितळ प्राण्यांचा धुमाकूळ आदी समस्यांचा पाढा नागरिकांनी जनता दरबारात मांडला.
यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करीत ज्या विभागासाठी संबंधित समस्या आहे त्या अधिकाऱ्यांनी तत्काळ उत्तर देत, समस्यांचा समाधान न झालेल्याना त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी आ.मसराम यांनी दिले.
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या कामात हयगय केली त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासह जे कर्मचारी जनता दरबाराला उपस्थित नव्हते, अशांना नोटीस बजावित त्यांचेवर काय कारवाई केली, याचे स्पष्टीकरण सात दिवसात देत याबाबत अवगत करण्याचे स्पष्ट निर्देश आ.मसराम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी तहसीलदार प्रीती डूडूलकर, गटविकास अधिकारी प्राची कोचरे, नगर परिषद मुख्याधिकारी कुंभरे, कृषी अधिकारी कांबळे, माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, माजी उपसभापती नितीन राऊत, सागर वाढई, जावेद शेख तसेच तालुक्यातील अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
जनता दरबारातच तात्काळ मार्गदर्शनासह मदत…
नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची सविस्तर नोंद घेत काही तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले. दरबारात महिलांनी शासकीय योजनांमधील अडथळे, शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा, युवकांनी रोजगाराच्या संधी व कौशल्य विकासाशी संबंधित प्रश्न मांडले. अनेकांना तिथेच तातडीने मार्गदर्शन व मदत मिळाली. यावेळी गुंतागुंतीच्या प्रकरणांवर ठराविक कालावधीत कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.



