ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, शैक्षणिक सत्र 2025-26 करिता मागासवर्गीय मुला-मुलींसाठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या या वसतीगृहांमध्ये व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, कनिष्ठ महाविद्यालय तसेच शालेय विभागातील अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रथम https://hmas.mahait.org या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून संबंधित शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल कार्यालयात ऑफलाईन स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेचे सुरळीत व पारदर्शक व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, निर्वाहभत्ता तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही संधी साधत वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील खालील वसतीगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
रामनगर, विसापुर रोड, गुणवंत (मुलांचे), अहेरी, आरमोरी, नवेगाव व चामोर्शी येथील शासकीय वसतीगृहांचा यामध्ये समावेश आहे.



