एक उत्तूंग यशाचा मानकरी :- आशिष बालासाहेब साळुंके

दरवर्षी शाळेतून दहावी पास होवून शेकडो विद्यार्थी जात असतात. शाळेत प्रवेश घेतांना प्रत्येक विद्यार्थी हा कठीण हिरा असतो.शिक्षक प्रत्येक विद्यार्थी हिऱ्यास ज्ञानाच्या कासेवर घासत असतो. आणि अध्यापणाचे विद्याजल देवून शुद्ध करित असतो. जो हिरा शिक्षकांच्या या प्रक्रियेत एकरूप होतो. तोच चकाकत असतो. असाच एक हिरा शिक्षक स्पर्शातून चकाकला तो म्हणजे आशिष बालासाहेब साळुंके होय.

            नुकताच तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होवून राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली. या उल्लेखनीय यशाने डोंगरकडा गाव पंचक्रोशीत बहुमानाने उंचावत आहे.

           आशिष साळुंकेचा जीवन परिचय हा युवा वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.म्हणून खास मी माझ्या लेखणीतून उतरवत आहे.

             आशिष आमच्या शाळेचा विद्यार्थी. तसे पाहिले तर त्याचे सर्वच भाऊ बहिण आमचे विद्यार्थीच आहेत. त्यामुळे आशिषचा जीवन परिचय मी सविस्तर सांगू शकेल.

             आशिष बालासाहेब साळुंके हा डोंगरकडा येथील रहिवासी. वडील सरकारी नोकर होते. पण वडीलांचे पितृछत्र बालपणीच हरवले. कुटुंबात एकूण चार भाऊ एक बहिण आणि आई असा परिवार. आईच्या सुसंस्कारात या कुटुंबाची जडण घडण झाली. त्यात मोठा भाऊ गोविंद अनुकंपात नोकरीस लागला. आणि साळुंकेच्या संसार रथास गती मिळाली. सर्व भाऊ जोमाने भावाच्या छात्र छायेखाली शिक्षण घेवू लागली. तशीच त्यांना यशाची फळे मिळत गेली. गजानन साळुंके दुसरा भाऊ शिक्षक म्हणून लागला.तर आनंद शेतीत गुंतला.साळुंके कुटुंबात शिक्षणाचे वारे वाहू लागले. ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’. हे सर्वांनी हेरले होते.

              आशिष पहिली ते चौथी जि.प.प्रा.शा. डोंगरकडा येथून पास होवून त्याचे पुढील माध्यमिक शाळा पाचवी ते दहावी कै.बापूराव देशमुख हायस्कूल मध्ये गावातच झाले. सोबत बहिण आश्विनी ही होती. मुळात हे दोघेही बहिण भाऊ स्वभावाने अतिशय शांत, संयमी, शिस्तबद्ध, मनमिळाऊ, ध्येय वेडे आणि जिद्दी होते. मी त्यांना इंग्रजी विषय शिकविला.त्याचे इंग्रजी, गणित, आणि विज्ञान हे विषय चांगले होते. आशिष एक सर्व साधारण विद्यार्थी.पण त्याच्या अभ्यासात तत्परता आणि नियमितता असायची. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. असेच त्याचे व्यक्तीमत्व.हाच आशिष भविष्यात यशाचे एवढे मोठे उत्तुंग शिखर गाठणार याची कल्पना नव्हती.पण निर्भरता,आत्मविश्वास आणि बुद्धीमता ही त्रिसूत्री असेल तर अशक्य ही शक्य होते, हे सिध्द होते.

          आमच्या शाळेतून दहावी झाल्यानंतर तो अकरावी (विज्ञान)साठी नांदेड या ठिकाणी गेला.कुटुंबातील वातावरणात शैक्षणिक असल्याने वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. कारण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर यश हे हमखास असते. हे नक्कीच. बारावी झाली आणि पुढील इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी त्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे, इंन्स्ट्रुमेशन इंजिनिअरिंग पूर्ण केले.

           पदवी शिक्षण पूर्ण झाल्या नंतर खरा जीवन मार्ग निवडायचा असतो. हि वेळ म्हणजे जीवनाचा टर्निंग पाँईंट असतो.याचवेळी त्याच्या चौकस नजरेने आजूबाजूचे वातावरण हेरले. त्यावेळेस काही विद्यार्थी एमपीएससी ची परिक्षा देत होते. तसेच भाऊ गजानन सरांचा मित्र रुमाले याने या परिक्षेत यश संपादन केले होते. तेच गजाननने आशिषला या यशाविषयी सांगितले. तेव्हा अभ्यास करणारास कोणतीच परिक्षा अवघड नसते. हे लक्षात आणून दिले. आणि लगेच एमपीएससीचे ध्येय मनात ठेवून जीवनाची वाटचाल सुरु केली.

          पुणे येथे युनिक अकँडमीस २०१८ ते २०२० मध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे या अकँडमीने महाराष्ट्राला मोठमोठे अधिकारी दिलेत.त्र हे एक विशेष.पण कोरोणाच्या महामारीमध्ये त्यास घरी यावे लागले. पण ध्येयाने झपाटलेल्या माणसाला कोणतीच अडचण आडवी येवू शकत नाही. म्हणतात ना,कष्ट करणाराच्या रस्त्यावरील काटे ही फुले होत असतात.असेच झाले.

         गावी येवून स्वअध्ययन करुन दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला. याच कष्टाचे फळ म्हणजेच सन २०२० ते २०२३ या तीनते चार वर्षांच्या काळात राज्य सेवेच्या तीन मुख्य परिक्षा पास केल्या.पण अपयश आले म्हणून कधी तो निराश झाला नाही. ध्येय उराशी घेवून जिद्दीने तो पेटून उठला. स्वतः शी त्याने स्पर्धा केली.अखेर यशाने त्याला जिंकले.

            तो म्हणतो जो थांबला तो संपला.स्पर्धा परिक्षेत सातत्य आणि नियमिता आवश्यक आहे. एखादी परिक्षा दिली. म्हणजे निकाल येई पर्यंत वाट पहाणे म्हणजेच आपला वेळ घालवणे होय.त्या साठी पूर्ववत अभ्यास चालू ठेवणे. हेच यशाचे गमक म्हणावे लागेल. 

           २०२३ मध्ये एमपीएससीची परिक्षा पास होवून STI पदी निवड झाली आणि महाराष्ट्रात रँक ओपन (जनरल)मधून ५०क्रमांक पटकावला.एवढेच नाही हिंगोली जिल्हा तलाठी पदी ही निवड झाली तर पीएसआय,एएसओ याचा निकाल येण्याचा संभव आहे.

           युवा वर्गाला एक प्रेरणादायी सल्ला सांगताना आशिष म्हणतो,की जर मनात ध्येय निश्चित केले तर तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आपोआप सापडतात. जिद्द चिकाटी, आणि कष्ट असतील तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपले भाग्य उज्ज्वल करु शकतो.

नक्कीच हा प्रेरणादायी आदर्श विद्यार्थी समोर ठेवतील,ही अपेक्षा.

           आशिषचे यश हे पंचक्रोशीतील पहिले यश आहे.या यशाने गावाचे नाव जिल्ह्यात उंचावले आहे.तर कुटुंबातील भावंडांचे मिळालेले वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य, प्रेम यांचे सार्थक झाले आहे.यातून मिळालेला आनंद गगनचुंबी झाला आहे. आणि ज्या शिक्षकांचा या यशात ज्ञानस्पर्श झाला, आणि हा हिरा चकाकला..हा आम्हा शिक्षकवर्गाचा बहुमान असून अभिमानास्पदच आहे.

         या यशाचे विविध स्तरावर होणारे सत्कार सोहळे हिच विद्वत्तेची उंची आहे. हा आनंद शब्दांत व्यक्त होवू शकणार नाही.

म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, क्षेत्रे पुज्यते राजा:,विद्वान सर्वत्र पुज्यते।

 येणाऱ्या नवपिढीने हेच लक्षात घ्यावे की, विद्वत्तेसमोर जगात सर्व काही शक्य आहे.

           यानिमित्ताने आशिषसाठी अभिनंदन.. आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हा प्रगतीचा आलेख असाच वाढत जावो…शुभेच्छा..

 बाबूराव पाईकराव

     डोंगरकडा

   9665711514