पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी वडसा/देसाईगंज
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- घरात सुख-शांती हवी असेल तर परस्परांमध्ये आदर आणि विश्वास असणे आवश्यक आहे. कुटुंब सुखी असेल तर समाज सुखी होतो आणि समाज सुखी असेल तर राष्ट्र बळकट होते. हेच तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ उत्सव साजरा न करता त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कमलेश उके विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर लाडे यांनी केले.
देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर येथे शिवजयंती महोत्सव समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरवातीला शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय शिवाजी, जय भवानी,” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचा सपना धाकडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्ञानेश्वर लाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नलिनी कुथे, उपसरपंच नेताजी सोंदरकर, पोलीस पाटील प्रेमदास चहांदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दत्तात्रय लेंनगुरे, ग्रा.पं. सदस्य चक्रधर बनकर, ग्रा.पं. सदस्या करिष्मा सोंदरकर, अल्का मोहुर्ले, वर्षा चंडिकार, बिसन घोरमोडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मेंढे, शिक्षक पंकज नाकाडे, राकेश मडावी, सुरेश झलके, गणेश ढवळे, रोशन मेश्राम, हितेश मेश्राम, गुलाब कुंभरे, नामदेव अलामे, सुरेश आदे, बाबुराव देशमुख, अजय मोहुर्ले, स्वप्नील गुरनुले, चंद्रपाल भुरके, प्रदीप पारधी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना लाडे म्हणाले की, समाजात विविध जाती, पंथ व विचारांचे लोक एकत्र राहतात. मतभेद असले तरी समाजात ऐक्य आणि विकास व्हावा, मनभेद ठेवू नये ही सर्वांची अपेक्षा असते. मात्र आज माणसामाणसांत दुरावा वाढताना दिसतो. कित्येक वर्षांनंतरही ज्यांची आठवण आदराने केली जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.अनेक राजकर्त्यांचा अभ्यास केल्यानंतर असे जाणवते की खरा आदर्श राजा कोण? याचा विचार केला तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या स्वाभिमानाला नवे बळ दिले. त्यांच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांनी प्राणार्पण केले. बाजी प्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत दिलेले बलिदान आजही प्रेरणादायी आहे. महाराज विशालगडावर सुरक्षित पोहोचल्याचा तोफांचा आवाज ऐकेपर्यंत त्यांनी खिंड सोडली नाही. हीच खरी स्वामिनिष्ठा असल्याचे लाडे यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचे राज्य न्याय, सन्मान आणि स्त्रीसन्मानाच्या तत्वांवर आधारलेले होते. शत्रूच्या स्त्रियांचाही त्यांनी सन्मान राखला. धैर्य, संयम आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी स्वराज्य उभे केले. स्वाभिमान, निष्ठा, धैर्य आणि स्त्रीसन्मान — हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक चक्रधर पारधी यांनी केले. संचालन खुशाल ठाकरे यांनी केले, तर मान्यवरांचे आभार मनप्रीत अलोणे यांनी मानले. चार वाजताच्या सुमारास शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणूक गावातून काढून डिजे वाजविण्यात आला. या डीजेच्या तालावार युवक थिरकले, सायंकाळी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती महोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



