दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “शिवरायांचे तत्वज्ञान हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या समाजजीवनासाठी दिशादर्शक आहे. न्याय, स्वाभिमान, शौर्य आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांवर उभारलेले शिवराज्य हेच खऱ्या अर्थाने आदर्श समाजव्यवस्थेचे प्रतीक आहे. शिवविचार अंगीकारल्याशिवाय समाजपरिवर्तन शक्य नाही,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवस्मारक येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका पुजा घुंडरे, कांचन येळवंडे, ऋतुजा घुंडरे, साक्षी कुऱ्हाडे, नगरसेवक हेमंत कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजपचे सचिव किरण येळवंडे, विवेक घुंडरे उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष कुऱ्हाडे पुढे म्हणाले, “युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. स्त्री-सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य या क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतल्यासच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित नाटिका, पोवाडे आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.



