दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर आज शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रशांत कुऱ्हाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दिमाखात दाखल केला. विकासाचा ठोस अजेंडा आणि प्रभागनिहाय समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या भूमिकेसह कुऱ्हाडे यांनी अर्ज दाखल करताच समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अर्ज दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध रॅलीसह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचत कुऱ्हाडे यांनी आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारी दाखल केली.
विकासावर भर – प्रशांत कुऱ्हाडे यांचा संदेश
अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले,
“आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि जवाबदार प्रशासन देणे हीच माझी प्राथमिकता आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते-विजयोजना, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, नदीकाठ परिसंरक्षण आणि पर्यटन सुविधा हे आमचे मुख्य लक्ष असणार आहे.”
मुख्य मुद्दे व निवडणूक अजेंडा…
सतत चालू पाणीपुरवठा योजना – गळती नियंत्रण, नवीन जलवाहिन्या आणि शुद्ध पाणी पुरवठ्यावर भर.
वाहतूक कोंडी नियंत्रण – कार्तिकी आणि वर्षभर भाविकांच्या गर्दीचा विचार करून सुटसुटीत मार्गयोजना
नदीकाठी सौंदर्यीकरण व स्वच्छता – इंद्रायणी नदीकाठ पर्यावरण संरक्षण प्रकल्प
पर्यटन विकास – श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी परिसराचा स्मार्ट डेव्हलपमेंट
महानगर पातळीवर सुविधा – कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही, स्मार्ट स्ट्रीट लाइट्स
महिला-युवा कल्याण – रोजगार प्रशिक्षण उपक्रम, सांस्कृतिक व क्रीडा सुविधा.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…
कुऱ्हाडे यांचा अर्ज दाखल होताच कार्यकर्त्यांत मोठा उत्साह पाहायला मिळाला. ‘विकासासाठी प्शांत कुऱ्हाडे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आगामी दिवसांत प्रचाराची रणनीती, जनसंपर्क मोहिमा आणि भाजपच्या शहर विकास आराखड्याची घोषणा होणार असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
आळंदी नगराध्यक्षपदासाठी प्रशांत कुऱ्हाडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार असून नागरिकांचे लक्ष आता प्रचार मोहीम आणि पक्षनिहाय जाहीरनाम्याकडे लागले आहे.



