दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला जोरदार सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपाने दमदार एंट्री केली. खुशी सागर बोरूंदिया आणि संतोष मारुती रासकर या दुहेरी उमेदवारीचा अर्ज दाखल होताच प्रभागातील राजकीय वातावरण तापले. दोन्ही उमेदवारांच्या सक्रिय कामकाजामुळे आणि विकासाभिमुख प्रतिमेमुळे या उमेदवारीकडे मतदारांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी बोरूंदिया आणि रासकर मोठ्या समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. भाजपाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. अर्ज सादर केल्यानंतर खुशी बोरूंदिया म्हणाल्या, “प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता व वाहतूक समस्या यावर ठोस उपाय करण्याचा आमचा संकल्प आहे. नियोजनबद्ध विकास हा आमच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असेल.” दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील दीर्घकालीन व मूलभूत समस्या ओळखून त्यावर उपाययोजनांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
खुशी बोरूंदिया म्हणाल्या, “प्रभाग क्रमांक ५ मध्ये मी राजकारणात येण्यामागचा उद्देश सत्ता नव्हे, तर नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष समस्यांवर उपाय करणे हा आहे.”
संतोष रासकर म्हणाले, “प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत सोयी-सुविधा पोहोचवणे हेच आमचे प्राधान्य आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता या दोन समस्या आम्ही तातडीने हाताळणार आहोत.”
पक्ष नेतृत्वाचा विश्वास – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने बोरूंदिया–रासकर या जोडीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. सातत्यपूर्ण जनसंपर्क, सामाजिक कार्यातील सक्रियता आणि तरुण मतदारांमधील लोकप्रियता यामुळे ही उमेदवारी चर्चेत आली आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये निवडणुकीची चुरस वाढत असतानाच भाजपाच्या या दुहेरी उमेदवारीमुळे स्पर्धा अधिक रंगात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांकडूनही दोन्ही उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून “विकासासाठी मजबूत पर्याय” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.



