Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — खारी फाट्यावर पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह, चिखलदरा परिसरात...

ब्रेकिंग न्यूज… — खारी फाट्यावर पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह, चिखलदरा परिसरात खळबळ… — मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू; पोलिसांचा तपास वेगाने सुरू…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

       दखल न्युज भारत

चिखलदरा तालुका – १८ ऑक्टोबर २०२५

         चिखलदरा तहसीलमधील खारी गावाजवळील भांडुम रोडवरील खारी फाट्यावर बांधलेल्या पुलाखाली शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, पुलाखाली काही नागरिकांना महिलेचा संशयास्पद अवस्थेत पडलेला मृतदेह दिसल्याने त्यांनी तात्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक प्रशांत मसराम यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली.

         प्राथमिक तपासात मृतदेह काही दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या गावांमध्ये व परिसरात ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरू केली असून, विविध ठिकाणांवरील हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत.

        घटनास्थळाजवळ कोणतेही ओळखपत्र किंवा वस्तू सापडल्या नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा ठरत आहे. मृतदेह पुढील तपासासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

         या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत सर्वांना दूर ठेवले. दरम्यान, पोलिसांनी अपघात, आत्महत्या की काही संशयास्पद गुन्हा या सर्व शक्यतांचा तपास सुरू केला आहे.

            चिखलदरा पोलिसांच्या मते, मृत महिलेचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अलीकडील काळात हरविलेल्या महिलांविषयी माहिती असल्यास चिखलदरा पोलिसांशी संपर्क साधावा.

              पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रशांत मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी पोलिस विविध दिशांनी तपास करत आहे.