Home देशविदेश राष्ट्रद्रोही आणि राष्ट्राभिमानी…

राष्ट्रद्रोही आणि राष्ट्राभिमानी…

        हल्ली कोण राष्ट्रद्रोही ? आणि कोण राष्ट्राभिमानी ? याची स्पर्धा चालू आहे.पण राष्ट्र आणि धर्म यातील फरकच माहीत नाही,म्हणून ही स्पर्धा चालू झाली,शिवाय धर्म श्रेष्ठ की राष्ट्र श्रेष्ठ ? हे पण माहीत नाही,म्हणून ही स्पर्धा लागलेली आहे.अन्यथा स्पर्धा लागण्याची गरज नव्हती.अर्थात ज्यांना देव धर्म आणि राष्ट्र या संकल्पनांची व्याख्या किंवा स्पष्टता असूनही असे लोक ही स्पर्धा लावतात,यात भाग घेतात म्हणजे याचा अर्थ ” दाल मे कुछ काला है ” म्हणजे सत्तेचे राजकारण असावे,नव्हे हेच कारण होय.

    राष्ट्राला प्राधान्य देण्याऐवजी धर्माला प्राधान्य देणे,म्हणजे राष्ट्रापेक्षा धर्म श्रेष्ठ मानणे,आणि राष्ट्राला दुय्यम स्थान देणे म्हणजे राष्ट्रद्रोह होय,अशी व्याख्या करून येथील मुस्लिम राष्ट्राऐवजी धर्म महत्वाचा मानतात,म्हणून ते राष्ट्रद्रोही आहेत,आणि मुस्लिम अल्पसंख्याक म्हणून त्यांना आपले बंधू समजून मानवतेच्या माणुसकीच्या भावनेने त्यांना जे हिंदू लोक मदत करतील,जवळ करतील त्या हिंदूंना देशद्रोही म्हणणे असा सध्या प्रचार चालू आहे,आणि तोही सत्ताधारी राजकार्त्या सहित.

     जेंव्हा आपण राष्ट्रापेक्षा धर्मश्रेष्ठ म्हणतो तेंव्हा हिंदू ( वैदिक ) पण हे मान्य करतात की,” आम्हाला आधी धर्म आणि नंतर राष्ट्र ,असा आमचा क्रम आहे,याचा अर्थ जे मुस्लिम लावतात तेच आहे.म्हणजे राष्ट्र आणि धर्म या पैकी प्राधान्य दोन्ही धर्माचे लोक राष्ट्राऐवजी धर्मालाच देतात,हे सिद्ध होते.

      आता राहिला प्रश्न लोकसंख्येचा,म्हणजे ज्या धर्माचे लोकांची संख्या जास्त,त्यांचाच तो देश,असे समजणे म्हणजे ज्या जातीची संख्या ज्या गावात जास्त,त्याच जातीचे ते गाव होय,इतर जातींचे ते गाव नव्हे,असे समजणे होय.अर्थात कमी लोकसंख्या असलेल्या जातीचे धर्माचे लोक पिढ्यानपिढ्या पासून त्या गावात राहतात,तिथेच जन्मले,शेतीवाडी केली,मजुरी केली,अनेक पिढ्या खपल्या तरी तो गाव तो देश त्यांचा नाही,केवळ धर्माची किंवा जातीची संख्या कमी म्हणून ? हा कोणत्या बुद्धीचा तर्क म्हणायचा ? कोत्या संकुचित की व्यापक महान बुद्धीचा ? बंधुभाव बुद्धीचा,मैत्रभावाचा,की शत्रूभवाचा ? असा द्वेषभाव म्हणजे.विकृती नव्हे काय ? मग असे असेल तर संस्कृती,माणुसकीचे काय ? धिंडवडेच का ? आणि जिथे ज्या डोक्यात ज्या जातीत,ज्या धर्मात,संस्कृती माणुसकी मानवता नाही ? तो माणूस,जात,धर्म कसला ? त्यास माणूस किंवा धर्म तरी म्हणता येईल का ? 

     अर्थात हे प्रश्न देशात राहणाऱ्या सर्वच धर्मियांसाठी आहेत.केवळ हिंदुंसाठीच नाहीत.आपण ज्या मातीत जन्मलो, वाढलो,शिक्षण घेतले,काम केले,अन्न पाणी सेवन केले,त्या मातीशी प्रामाणिक राहणे,बेइमानी न करणे म्हणजे राष्ट्रप्रेम होय.देशप्रेम होय.आणि देशापेक्षा धर्मश्रेष्ठ म्हणून देशातील आपल्याच बांधवांना त्रास देणे म्हणजे धर्मद्रोह आहे,आणि राष्ट्रद्रोह पण असे.

     आपण संविधान मानले पाहिजे,कारण देव धर्म राष्ट्र नागरिक इत्यादी संबंधी जेंव्हा कुणाला शंका किंवा प्रश्न निर्माण होतात,तेंव्हा संविधान वाचावे,आणि त्यानुसार वर्तन करावे,म्हणजे आपले सारेच सामाजिक धार्मिक आणि नागरिकत्वाचे प्रश्न सुटतील.शंका प्रस्न दूर होतील,आणि सर्वांना शांततामय सुरक्षित जीवन जगता येईल.

     देश म्हणजे मातृभूमी.तिच्यात सर्वच जाती धर्माच्या लोकांना सामावून घेण्याची ताकद आहे.मातृभूमी म्हणजेच धरतीमाता.तीच आपणास जन्म देते,आपले पालनपोषण करते,वाढविते,काळजी घेते,शेवटी आपली आपले बांधव आपली अंत्ययात्रा काढून तिलाच परत करतात,तेंव्हा शेवटी तीच आपल्या उदरात घेते.म्हणून मातीशी बेईमान होऊ नये.ही नीतिमत्ता होय.नैतिक विचार आहेत.आपण जात धर्माचा गैरवापर करीत आहोत,केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी,हे नीतिमत्तेत बसत नाही.आणि स्वार्थी माणसांच्या बाजूने खोट्या माणसाच्या बाजूने सत्य नसते,म्हणून त्याचा कधीना कधी पराभव निश्चित आहे.हे लक्षात ठेवले पाहिजे.

    देव धर्म जात या गोष्टी,संकल्पना मुळे माणसामाणसात वितुष्ट येऊन भेदभाव निर्माण होत असेल,माणुसकी सोडण्याची वेळ येत असेल अशा वेळी,अशा गोष्टीना दुय्यमस्थानावरच ठेवणे,संयुक्तिक व विवेकी होईल.कारण आपली ओळख आधी ” माणूस ” म्हणूनच आहे,तेही प्राण्यांची जात सोडली म्हणून. आणि मग आपली ओळख जात धर्म म्हणून आहे.हे ध्यानात आणले पाहिजे.

   .राष्ट्रद्रोही म्हणजे राष्ट्राला बेईमान होणे,म्हणजे इथल्या मातीला,धरणीमातेला,अन्नपाण्याला बेईमान होणे होय, जी धरणीमाता आपणास अन्न पाणी देते,त्यामुळेच आपले शरीर ( हाडे रक्त मांस) बनले,अशा मातेला बेईमान होणे होय.अर्थात हेही विसरता कामा नये,की राष्ट्र म्हणजे केवळ जमीन जंगल पाणी डोंगर पर्वत नव्हे,तर या देशातील सर्व माणसे म्हणजेच राष्ट्र होय.माणसे वगळून राष्ट्र होऊ शकत नाही. एकाच देशाची म्हणजे एकाच आईची आपण सारे लेकुरे आहोत,म्हणजेच आपली ओळख अलग नावाने, आडनावाने,जातीने ,धर्माने असली तरी ती ओळख फक्त एकमेकास ओळखण्यासाठी आहे,एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आहे.एव्हढेच महत्त्व या गोष्टीस असे.अन्यथा आपण एकच देशाचे मातृभूचे बांधव आहोत,माझ्या देशावर माझे प्रेम असणे हे प्रामाणिक पणाचे लक्षण आहे.पण देशावर म्हणजे देशातील सर्व जनतेवर प्रेम आहे.हे विसरून चालणार नाही.आणि जेव्हा जेव्हा हे विसरतो,तेंव्हा तेंव्हा आपण एकमेकास झगडत असतो,भांडत असतो,मारत असतो.एकमेकांचे मुडदे पाडत असतो.तेंव्हा आपण राष्ट्रद्रोहीच ठरत असतो,याचे भान ठेवले पाहिजे.याचा अर्थ असा की,जे देव जात धर्म पंथ वर्ण यांचा बहाणा करून हिंसा करतात,ते सारेच देशद्रोही होतात,आणि जे माणुसकीला जगतात,देशात शांतता सुव्यवस्था ठेवतात,एकमेकांची देशबांधव म्हणून काळजी घेतात,तेच खरे देशभक्त आणि देशप्रेमी,राष्ट्रवादी होत.

        लेखक : दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 18 ऑक्टोबर 2025. फोन : 94 20 91 2209.