अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
वरूड :- सामाजिक माध्यमावरून बदनामीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने तरुणीचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिच्या नावाने खोटी चॅटिंग पोस्ट केल्यामुळे संबंधित तरुणीचे लग्न तुटल्याची धक्कादायक घटना वरूड येथे उघडकीस आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी २८ वर्षीय महिला असून, अज्ञात व्यक्तीने तिचे फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरून एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचा खोटा आभास निर्माण करण्यात आला. त्या अनुषंगाने काही इन्स्टाग्राम चॅटचे स्क्रीनशॉट तयार करून ते फिर्यादीच्या होणाऱ्या पतीला व भावाला पाठविण्यात आले.
या कृत्यामुळे फिर्यादीची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली आणि लग्न मोडले, असा आरोप तिने पोलिसांकडे केला आहे. या प्रकरणी वरूड पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ६६७/२०२५ नोंदविण्यात आला असून, कलम ६६ (C), ६६ (D) माहिती तंत्रज्ञान अधिनियम, तसेच कलम ३५६ (२) भारतीय न्याय संहिता २०२३ व कलम ५०० भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



