ब्रेकिंग न्यूज… — रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार… — शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण….

प्रितम जनबंधु

संपादक 

     शेतातील हातात आलेले पिक रानटी हत्ती तुडवत असताना शेतात आलेल्या रानटी हत्तीना परतावून लावत असताना एका हत्तीने हल्ला करून शेतकऱ्यास ठार केले. ही घटना मंगळवारी १७ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील दिभना या गावात घडली. होमाजी गुरनुले (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

              मागील काही दिवसांपासून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी हत्तींचा कळप गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली, दिभना या गावांमध्ये आला. या हत्तींनी धानपिकाचे प्रचंड नुकसान केले. मंगळवारी रात्री हे हत्ती शेतात आल्याचे कळताच होमाजी गुरनुले हे काही शेतकऱ्यांसह शेतावर गेले. हत्तींना परतावून लावत असताना एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्यावर हल्ला केला आणि सोंडेने आपटून ठार केले. वडसा वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.

            १६ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर एका हत्तीने सुधाकर आत्राम नामक वनविभागाच्या वाहनचालकास ठार केले होते. त्यानंतर महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी प्रचंड भयभीत झाले असून, त्यांना शेतीची कामे करणे दुरापास्त झाले आहे. 

               हातात आलेले भात पिक रानटी हत्तीच्या कडपाने पायाखाली तुडवून नासधुस करीत असल्याने शेतकरीवर्ग प्रचंड चिंताग्रस्त असल्याचे बघावयास मिळत आहे. तरी वनविभागाने याकडे तातडीन लक्ष घालुन प्रतीबंधात्मक उपाययोजना करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी तद्वतच सबब रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेकडुन होत आहे.