Home Political बहुजन चळवळीतील राजकीय पक्षांनी ‘बसप’च्या निळ्या झेंड्याखाली एक व्हावे! — एकत्रित...

बहुजन चळवळीतील राजकीय पक्षांनी ‘बसप’च्या निळ्या झेंड्याखाली एक व्हावे! — एकत्रित निवडणुका लढा, डॉ.हुलगेश चलवादींचे आवाहन…

दिक्षा कऱ्हाडे 

  वृत्त संपादिका 

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे चालवत बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर पुरोगामी महाराष्ट्रात वाटचाल करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या ‘हत्ती’ निवडणूक चिन्ह असलेल्या झेंड्याखाली बहुजन चळवळीतील राजकीय पक्षांनी एकत्रित यावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.१६) केले.

        बहुजनांनी एकत्रित येवून आगामी निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले. नववर्षात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बसप स्वबळावर लढणार आहे. मात्र, बहुजन चळवळीत काम करणारे तसेच आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्ष बसपसोबत एकत्रित आले तर सत्तेपर्यंत पोहचण्याचा मार्ग आणखी सुकर होईल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

         महापुरूषांचा विचार समोर घेवून जात सत्ताप्राप्तीचे स्वप्न बसपाने प्रत्यक्षात पुर्ण केले. मान्यवर कांशीराम जी यांनी सुरू केलेली ही वैचारिक चळवळ बहुजनांना ‘शासनकर्ती जमात’ बनवण्यासाठी सक्षम आहे, हे यावरून अधोरेखित होते. याच वैचारिक आंदोलनातून उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात ‘आयरन लेडी’ मा.सुश्री बहन मायावती जी यांनी तब्बल चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवून बहुजनांना मुख्य प्रवाहात आणले.

          बहुजन चळवळीचा गड असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात देखील हे शक्य आहे. मात्र, मत विभाजनसाठी बहुजनांना वेगवेगळ्या गटातटात विभाजित करण्यात प्रस्थापित पक्ष यशस्वी झाले, ही शोकांतिका आहे, अशी खंत डॉ.चलवादींनी व्यक्त केली.

          पंरतु, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुजनांनी एकत्रित येवून लढवल्या, तर राज्यातील बहुतांश महापालिका, जिल्हा परिषदा, नगर पंचायतींवर शोषित-वंचित-पीडित-उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांची सत्ता येईल, असा ठाम विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

         बहुजनांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय प्रश्न घेवून लढणाऱ्या राजकीय पक्षांनी एकत्रित येवून बहुजनांची आघाडी स्थापन करीत निवडणूक लढवली तर, बहुजनांच्या मतांचे विभाजन होणार नाही आणि शासनकर्ती जमात होण्यापासून कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष आपल्याला रोखू शकणार नाही, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.

        ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ या सूत्रानूसार एकत्रित येवून निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात देखील विचार केला जावू शकतो, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.