Home कृषी ऊसतोड मजूर कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी ताडपत्रीने तंबुची उभारणी करण्यास दंग…   — महाराष्ट्राच्या...

ऊसतोड मजूर कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी ताडपत्रीने तंबुची उभारणी करण्यास दंग…   — महाराष्ट्राच्या अनेक भागातून गावोगावी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

काही दिवसावर ऊस गळीत हंगाम जवळ आला असून पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०२५-२६ च्या गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह मध्यप्रदेश येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जिल्ह्यातील गावोगावी दाखल झाल्या आहेत. सध्या मजूर राहण्यासाठी राहुट्या उभारणीत दंग आहेत. तसेच सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या इंदापूर तालुक्यातील बाजारपेठा तसेच आठवडे बाजारात दिवाळीच्या तोंडावर उलाढाल वाढत आहे.

         जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ट्रक व ट्रॅक्टर एक आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यात गेले होते. ऊसतोड मजूर दिवाळीपूर्वी आपापली बिहऱ्हाडे बांधून कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत.

        नीरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील क्षेत्रावर बहुधा अनेक ऊस कारखान्यांची कमान अवलंबून असल्याने जादा टोळ्या या परिसरात दाखल होऊ लागल्या आहेत. नीरा भीमा सहकारी साखर कारखाना ऊसतोड मजूर पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे राहुट्या उभ्या करण्यात दंग मराठवाडा, मध्य प्रदेशातून आलेले ऊसतोड मजूर.

        निवडणुकीत मजुरांची ने-आण ठरणार जिकिरीची सध्या निवडणुकीच्या हालचालींना वेग येऊ लागला असल्याने नोव्हेंबर किंवा डिसेंबरला मतदान असल्याने ऊसतोड मजुरांना मतदानाला घेऊन जाणे व परत घेऊन येणे जिकिरीचे होणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांना तोपर्यंत सांभाळण्याचे कसब गाडी मालकांचे लागणार आहे.

          कारखाना (शहाजीनगर), कर्मयोगी शंकरराव पाटील (बिजवडी), सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (शंकरनगर), दि सासवड माळी शुगर फॅक्टरी (माळीनगर), विठ्ठलराव शिंदे कारखाना (गंगामाईनगर), भैरवनाथ शुगर (आलेगाव), बारामती अॅग्रो (शेटफळगढे), छत्रपती सहकारी साखर कारखाना (भवानीनगर आदींसह चार जिल्ह्यातील कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत.

          नीरा नरसिंहपूर परिसरातील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी, ओझरे, गिरवी, हरहर महादेव, टण्णू, आडोबावस्ती, नरसिंहपूर, सराटी, निरनिमगाव, गारअकोले, टाकळी, आलेगाव, शेवरे, संगम, गणेशगाव, तांबवे, माळीनगर आदी गावांत प्रत्येकी दहा ते वीस ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या भागातील सर्वच आठवडे बाजार व लहान मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायास सुरुवात झाली आहे.