उजनीतून भीमा नदीमध्ये दि.18 ला पाणी सोडण्याचा निर्णय : हर्षवर्धन पाटील… — इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी…

 

 नीरा नरशिंहपुर दिनांक :17

प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार , 

            उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी, पंढरपूर व सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी सोमवार दि.18 रोजी पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी दिली.

        ते म्हणाले, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर, टणु, पिंपरी बु., गिरवी, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, सुरवड, भाटनिमगाव, बेडसिंग, बाभूळगाव, हिंगणगाव आदी भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना गेली महिनाभरापासून नदीपात्र कोरडे असल्याने पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथे दि. 2 सप्टेंबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भीमा नदीच्या पात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्याचा विषय मी उपस्थित केला होता. त्यावेळी बैठकीस उपस्थित असलेले सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले होते. तसेच या संदर्भात माझे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. शासनाने उजनीतून पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.