दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी — एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद’ १९ व २० जुलै २०२५ रोजी हनुमानवाडी, आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातून ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी होणार असून, परिषदेसाठी नियोजित चार सत्रांत वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनातील भूमिका, आव्हाने, समस्यांचे स्वरूप व त्यावरील उपाय योजनांवर विचारमंथन होणार आहे.
परिषदेचा उद्घाटन समारंभ शनिवार, १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार असून, या प्रसंगी राज्याचे अन्न व औषधे प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीकांत भारतीय (विधान परिषदेचे सदस्य), डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, साहित्य व संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य), डॉ. सुनिल खांडबहाले (खांडबहाले डॉट कॉमचे संस्थापक) हे सन्माननीय वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड अध्यक्षस्थानी असून, डॉ.राहुल कराड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी, २० जुलै रोजी सकाळी ९.३० वा. ‘वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची वाटचाल’ या विषयावर तृतीय सत्रात माहिती तंत्रज्ञान व सामाजिक न्याय मंत्री श्री. आशिष शेलार उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे व अभय टिळक उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचा प्रमुख विषय…
‘वारकरी संप्रदायाची २१व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतिशील उपाययोजना’
या अंतर्गत समाजातील विविध समस्यांवर वारकरी कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन कसे करता येईल, यावर सखोल चर्चा केली जाईल.
या परिषदेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श सरपंच आपले विचार मांडतील.
परिषदेच्या प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिषद एमआयटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारली जात आहे. त्यांच्या मातोश्री, वारकरी संप्रदायाच्या निष्ठावान अनुयायी आणि कवयित्री सौ. उर्मिलाताई कराड यांचा तृतीय स्मृतिदिन २० जुलै रोजी आहे. यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत हभप यशोधन महाराज साखरे, डॉ.मिलिंद पांडे (प्र-कुलगुरू, एमआयटी डब्ल्यूपीयू), डॉ. शलिनी टोणपे (प्रभारी प्राचार्या, एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन) आणि प्रकाश महाले (सह समन्वयक, राष्ट्रीय सरपंच संसद) उपस्थित होते. ही परिषद आधुनिक काळातील सामाजिक समस्यांवर अध्यात्मिक व वैचारिक उपाययोजना शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



