पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- सेवा पंधरवाडा निमित्य देसाईगंज तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस ते यांची जयंती सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने देसाईगंज तालुक्यात महसूल विभागातर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
पांदन रस्ते शोधून त्यांना क्रमांक प्रदान करणे, सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि महसूल सेवक यांनी प्रत्येक गावात स्थानिक गावकऱ्यानसोबत शिवार फेरी करून सर्व पांदन रस्त्यांची माहिती प्राप्त केलेली आहे. सर्व पांदन रस्त्यांना भुमि अभिलेख विभागा मार्फत मोजणी करुन तहसिलदार यांचे मार्फत विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही सुरु आहे.
दि. 01/01/2011 पूर्वी शासकिय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या कुटूंबांना सदर शासकीय जमीनीवर प्रत्यक्ष अतिक्रमण केलेल्या जागेवरील संबंधितांना ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि महसूल सेवक यांनी भेटी देवून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याची कामे सूरु आहे, ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे काम सुरु आहे.
सदर पंधरवाड्यात लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यात येणार आहे.यात शेतीच्या सात बाऱ्यावर फक्त पतीचे नाव असेल तर सदर व्यक्तीने ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज आणि संमतिपत्र दिल्यास त्याचे पत्नीचे नाव सातबाऱ्यावर सहहिस्सेधारक म्हणून नोंद करण्यात येणार आहे.
तसेच या निमित्य देसाईगंज तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयात दाखले वाटप करण्यात येणार आहेत यात जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि जन्माचे प्रामणपत्र आदीचा समावेश आहे, ह्याच पंधरवाड्यात देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायत येथील पुनर्वसित गाव नवीन लाडज येथील नागरिकांना स्वतंत्र्य नवीन लाडज च्या नावाने सातबारा वितरित करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे मागील 1965 पासून नवीन लाडज हे गाव आमगाव गावात होते सन 2016 मध्ये अधिसूचना काढून सदर गावाला महसूली गाव म्हणून घोषीत करण्यात आले होते, येथील नागरिकांची प्रतीक्षा संपली असून ह्या गावाला आता स्वतंत्र सातबारा मिळणार आहे.
आतापर्यंत नवीन लाडज गावाला ऑनलाईन गाव क्रमांक प्राप्त नव्हते, येणाऱ्या 19 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली या ठिकाणी नवीन लाडज या गावातील लोकांना महसूल मंत्र्यांच्या हस्ते सातबारा वाटप होणार आहे, ह्या सर्व उपक्रमांचा लाभ देसाईगंज तालुक्यातील जास्तीत जास्त जनतेने घ्यावा असे आव्हान देसाईगंज तालुक्याचे तहसीलदार प्रीती डूडूलकर यांनी केले आहे.



