Home सांस्कृतिक सफला एकादशीनिमित्त आळंदीत भक्तांची मंदियाळी…

सफला एकादशीनिमित्त आळंदीत भक्तांची मंदियाळी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी नगरीत आज पहाटेपासून भक्तांची मोठी गर्दी उसळली. ‘पंढरीनाथा’च्या नामस्मरणात तल्लीन झालेले भाविक इंद्रायणी काठी आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावून उभे होते.

        पहाटे काकड आरतीनंतर समाधी मंदिरात विशेष पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. मंदिर परिसरात हरिनामाचा गजर, भजन-कीर्तनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. आळंदी, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.

          भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान प्रशासनाकडून दर्शन रांगा, स्वच्छता, पाणीपुरवठा व सुरक्षेच्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनीही चोख बंदोबस्त ठेवत दर्शन सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य केले. सफला एकादशीच्या निमित्ताने आळंदी नगरीत दिवसभर भक्तीचा उत्साह दिसून आला. हरिनामाच्या गजरात आळंदी आज पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघाली.