Home Political आळंदीत महायुतीत योग्य सन्मान मिळाला नाही तर शिवसेना स्वबळावर! :-  शहरप्रमुख राहुल...

आळंदीत महायुतीत योग्य सन्मान मिळाला नाही तर शिवसेना स्वबळावर! :-  शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी महायुतीतील स्थानाबाबत ठाम भूमिका मांडली आहे. “शिवसेनेला महायुतीत योग्य तो सन्मान आणि जागांचे वाटप मिळाले नाही, तर पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्यास मागेपुढे पाहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

        चव्हाण म्हणाले, “शिवसेना आळंदीत जनतेच्या प्रश्नांवर लढत आली आहे. स्थानिक पातळीवर आमचा मजबूत संघटनात्मक पाया आहे. त्यामुळे जर आमच्या पक्षाचा सन्मान राखला नाही, तर आम्ही स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊ.”

       नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांमध्ये जागावाटपाबाबत पडद्यामागे चर्चा सुरू असली, तरी स्थानिक स्तरावर मतभेद उघड होत असल्याचे दिसते. आळंदीत भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीन घटकांमध्ये उमेदवारांवरून ताण निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

       राहुल चव्हाण पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आळंदीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण स्थानिक नेतृत्वाचा सन्मान राखला नाही, तर जनतेच्या आशीर्वादाने शिवसेना स्वबळावर विजयी होईल याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.”

       या भूमिकेमुळे आळंदीतील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. महायुतीतील पक्षीय नेत्यांसाठी ही एक नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.