अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा :- पर्यटन नगरी चिखलदरा येथे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, माजी उपाध्यक्ष आणि ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते शेख नासीर अब्दुल गनी यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेने स्थानिक राजकारणात चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे.
मेळघाट परिसरात स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जाणारे शेख नासीर हे २००७ साली नगरसेवक आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात शहराच्या स्वच्छतेसाठी, पर्यावरण रक्षणासाठी, तसेच पर्यटनवृद्धीसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे नागरिक सांगतात. विशेषतः चिखलदऱ्यातील तरुणांमध्ये रोजगारनिर्मिती आणि खेळ व शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या उपक्रमांमुळे ते लोकप्रिय झाले.
शहरातील नागरिकांचा विश्वास आहे की, जर शेख नासीर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले, तर नगरपरिषदेला विकासाचा नवा वेग मिळू शकतो. “शेख साहेबांनी उपाध्यक्षपदाच्या काळात जे काम केले, त्याचा ठसा आजही कायम आहे. आम्हाला पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन हवे आहे,” असे एका स्थानिक उद्योजकाने सांगितले.
राजकीय वर्तुळातही या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चेला उधाण आले आहे. काही विद्यमान पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार आता आपापल्या गोटात रणनीती आखताना दिसत आहेत. या उमेदवारीमुळे विद्यमान राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
सध्या शेख नासीर अब्दुल गनी यांनी अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या समर्थकांचा उत्साह पाहता ते निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक भक्कम झाली आहे. “शहराचा विकास आणि जनतेच्या विश्वासाचे राजकारण हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी बोलताना थोडक्यात सांगितले.
चिखलदरा ही पर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली नगरी असल्याने येथील नगरपरिषदेला विकासाच्या असंख्य संधी आहेत. या पार्श्वभूमीवर स्वच्छ प्रतिमा असलेल्या शेख नासीर अब्दुल गनी यांच्या संभाव्य उमेदवारीकडे संपूर्ण मेळघाटचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या निर्णयाची अधिकृत घोषणा होताच चिखलदऱ्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळेल, यात शंका नाही


