Home Maharashtra पुणेकरांना मोठा दिलासा, दिवेघाट-हडपसर मार्ग सहा महिन्यांत पूर्ण होणार… — फलटणमध्ये...

पुणेकरांना मोठा दिलासा, दिवेघाट-हडपसर मार्ग सहा महिन्यांत पूर्ण होणार… — फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

फलटण : पुणे आणि परिसरातील वाहनधारक, प्रवासी तसेच वारकरी बांधवांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फलटण दौऱ्यात केली. बहुचर्चित संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या पाहणीनंतर सुरवडी (ता. फलटण) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ‘दिवेघाट ते हडपसर’ या रखडलेल्या मार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही दिली.

          दिवेघाट ते हडपसर हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे रखडला होता. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी होती. विशेषतः पुणे शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

             या पार्श्वभूमीवर ना.गडकरी यांच्या घोषणेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दृष्टीनेही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे पालखी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत वारकरी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात होते.

        पत्रकार परिषदेत बोलताना ना.गडकरी म्हणाले कि पालखी महामार्गासह इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही गती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले जात असून, नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

            या घोषणेनंतर पुणेकरांसह परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, रखडलेल्या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.