Home क्रीडा सलग दुसऱ्या वर्षी पार्वती मतिमंद विद्यालयाला स्पेशल ऑलिम्पिक मध्ये सुयश… —...

सलग दुसऱ्या वर्षी पार्वती मतिमंद विद्यालयाला स्पेशल ऑलिम्पिक मध्ये सुयश… — पार्वती निवासी मतिमंद विद्यालयाच्या दोन बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- स्पेशल ऑलिम्पिक भारत (महाराष्ट्र) आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अथलेटिक्स व फुटसल राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन किट्स महाविद्यालय, रामटेक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

            या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून २७७ बौद्धिक दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडविण्यासाठी ही बौद्धिक अक्षम व्यक्तींची स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

           यावेळी पार्वती निवासी मतिमंद विद्यालय देसाईगंज, गडचिरोली येथील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. याठिकाणी धावणे, गोळा फेक, लांब उडी, टेबल टेनिस, स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल आदी स्पर्धांचे सामने घेण्यात आले. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील पार्वती निवासी मतिमंद विद्यालयातील कु. तेजल सुधाकर तुलावि १४ वर्षाखालील ५० मिटर धावणे या स्पर्धेत प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळविले तर स्पॉट जंप या स्पर्धेत तृतीय येऊन कांस्य पदक मिळविले. तसेच हर्षल बनकर १४ वर्षांखालील स्पॉट जंप या स्पर्धेत द्वितीय येवून रौप्य पदक मिळविले तर ५० मिटर धावणे या स्पर्धेत तृतीय येऊन कांस्य पदक मिळविले.

           यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तेजल व हर्षल यांनी आपल्या यशस्वी खेळाचे श्रेय शारिरीक शिक्षक सतीश मडावी यांना दिले. संचालक नीलकंठ दहीकर, मुख्याध्यापक सचिन कुकडे, विशेष शिक्षक सत्यवान थेरकर, जाहेद पठाण, विनोद कुडमते, शितल गायकवाड, ललिता खोब्रागडे, राहुल दहिकर, चंदनप्रकाश पटले, प्रवीण सातपुते, प्रशिक बडोले यांनी तेजल हिचे अभिनंदन केले.

चौकट…

     गडचिरोली जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी काम करणारी शाळा पार्वती निवासी मतिमंद विद्यालय येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा स्पेशल ऑलिम्पिक मधे सुयश प्राप्त केले आहे. ही देसाईगंज तालुक्यासाठी व गडचिरोली जिल्ह्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.

        परंतु शासन स्तरावरून अद्याप कोणीही याबाबत दखल घेतलेली नाही. विजेते बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील सुप्त कलागुण जे समाजासमोर आणून त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. याकरिता शासन स्तरावरून विद्यार्थ्यांचा सत्कार होणे अत्यंत आवश्यक आहे.