ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांना लाखनीत आढळला दुर्मिळ पिवळ्या रंगाचा तस्कर साप… — ह्याच दुर्मिळ तस्कर सापाने दिलेल्या अंड्यातून कृत्रिम पद्धतीने 3 अंड्याची उबवणूक यशस्वी… — तीन नवीन तस्कर पिल्लांचा कृत्रिम उबवणुकीने झाला जन्म… 

चेतक हत्तीमारे

प्रतिनिधी

लाखनी:-

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचा सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे याला केसलवाडा रोडवरील दुर्गेश चोले यांच्या आवारभिंतीजवळ जखमी अवस्थेत साप असल्याची सूचना 20 जानेवारीला मिळाली.विवेकने त्वरित जाऊन जखमी तस्कर सापाला ताब्यात घेतले.जखमी असल्याने त्याची सुश्रुषा करण्याकरिता घरी आणले.घरी आणल्यावर त्याला ह्या तस्कर सापाचा रंग हा नेहमीसारखा न आढळता तो पिवळट दिसला.याबद्दल त्याने ग्रीनफ्रेंड्स कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांना कळविले.त्यांनी सापाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की तस्कर सापाला इंग्रजीत ‘ट्रिनकेट’ असे नाव आहे तर याचे शास्त्रीय नाव ‘सिलोग्यानथस हेलेना’असे असून हा निरुपद्रवी बिनविषारी प्रजातीचा साप आहे.तस्करचा रंग नेहमी तपकीरी चॉकलेटी रंगाचे असतात पण अशा प्रकारचा मध्यम पिवळट रंगाचा तस्कर आढल्याची नोंद पूर्व विदर्भात तरी इतक्यात आढळली नाही. या घटनेला पार्शिअली अलबिनो किंवा पार्शिअली लुइसिस्टिक असे सुद्धा म्हणतात. नेहमीचे रंगद्रव्याची कमतरता झाल्याने असा पिवळट रंग प्राप्त होतो अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी पुरविली .या जखमी तस्कर सापावर सरीसृप संशोधक विवेक व सर्पमित्र पंकज भिवगडे,मयुर गायधने,नितीन निर्वाण,सलाम बेग,धनंजय कापगते,नितीन निर्वाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू होते. पुढे दोन दिवसाने या दुर्मिळ पिवळ्या तस्कर सापाने सहा अंडी 22 जानेवारीला दिली.सरीसृप संशोधक विवेकने या अंड्याना घरीच कृत्रिम पद्धतीने इनक्युबेटर मध्ये ठेवून उबविण्याचा निर्णय घेतला. पुढे पाच सहा दिवसाने तस्कर साप पूर्ण बरा झाल्यावर निसर्गाच्या सानिध्यात वनविभागाला कल्पना देऊन सोडण्यात आले. याचवेळी वनविभागाचे वनरक्षक कृष्णा सानप यांना सहा अंडी घरीच इनक्युबेटर ठेवून उबविणे सुरू असल्याची कल्पना देण्यात आली.यापैकी 3 अंड्यामधून काल 13 एप्रिलला बरोबर 82 व्या दिवशी तस्करचे पिल्ले बाहेर पडले असून विवेक बावनकुळे तसेच इतर सर्पमित्रांनी केलेल्या अथक परिश्रमाने जखमी तस्करला सापाला जीवदान दिल्यामुळे निसर्गात अजून तीन नवीन तस्कर पिल्ले तपकिरी चॉकलेटी रंगाचे मिळाले व त्यांचे परिश्रम सार्थकी लागले आहे. सरीसृप संशोधक विवेकच्या या परिश्रमाचे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी तसेच इतर निसर्गप्रेमी नागरिक व सर्पमित्रांनी अभिनंदन केले आहे.विवेकने यापूर्वी सुद्धा लाखनी परिसरातील अनेक पाली ,सरडे,बेडूक या सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करून काही दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या व तसेच अनेक जखमी प्राणी, पक्षी,सरपटणारे प्राणी यांची सुश्रुषा करून त्यांना जीवदान देण्याचे अखंड कार्य अविरतपणे करीत असतो.तसेच त्याने स्वतःच्या संशोधन कार्यावर आधारित दोन रिसर्च जर्नल सुद्धा प्रा. अशोक गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित केले आहे.त्याच्या या अविरत निसर्गप्रेमी कार्याबद्दल अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे त्याचा दरवर्षी ‘उत्कृष्ट निसर्गमित्र सर्पमित्र पुरस्कार’ प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन करण्यात येतो.