प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
चंद्रपूर : विशेष प्रतिनिधी शिक्षकांमधील सृजनशीलता, कलागुण आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला वाव देण्यासाठी चंद्रपूर येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय शिक्षण महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट (LOLT) आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक शिव पार्वती हॉलमध्ये पार पडलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील 218 शिक्षकांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवत व्यासपीठ गाजवले.
या महोत्सवात ‘एक दिवस शिक्षकांसाठी’ या ब्रीदवाक्याला साजेशा अशा आयोजित केलेल्या विविध आठ स्पर्धा व त्यांना दिलेली नावेही विशेष आकर्षणाचा भाग ठरली. अक्षरमोती (सुलेखन स्पर्धा), ‘सिखना और सीखाना’ (शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा), ‘जागर विचारांचा’ (वक्तृत्व स्पर्धा), ‘माझ्याकडे पहा’ (भित्तीपत्रक स्पर्धा), ‘शब्दांची माळ फुले’ (काव्यवाचन स्पर्धा), ‘मेरी आवाज सुनो’ (गायन स्पर्धा) तसेच ‘ताल से ताल मिला’ (एकल आणि समूह नृत्य) अशा स्पर्धांचा समावेश होता.
एका ५६ वर्षीय मुख्याध्यापकांनी व्यासपीठावर सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यावरूनच शिक्षकांमधील उत्साह आणि ऊर्जेची प्रचिती आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एकूण ८७ शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळा-महाविद्यालयांतून २१८ शिक्षकांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे एकूण सहभाग संख्या ४१३ पर्यंत पोहोचली होती.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सुधीरकुमार गजभिये (शिक्षण विभाग प्रमुख – LOLT), आदित्य कदम (व्यवस्थापक, LIF), दीपक साळवे (उपव्यवस्थापक, LIF) आणि धनपाल फटिंग (गटशिक्षणाधिकारी, चंद्रपूर), तसेच कांचन थोरवे (वरिष्ठ व्यवस्थापक, LOLT), सुनील मुत्यालवार (विस्तार अधिकारी, BRC चंद्रपूर), सौ. भोंड (विस्तार अधिकारी, BRC बल्लारपूर) आणि संदीप राऊत (प्रशिक्षण व्यवस्थापक, MBIF) यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून शिक्षकांचे कौतुक केले.
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. “शिक्षकांच्या कल्पकता आणि मेहनतीमुळेच समाज घडतो, त्यांच्या या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणे हाच या महोत्सवाचा उद्देश आहे,” असे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व आयोजनात लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे समन्वयक मुकेश भोयर, सारिका राऊत, सहाय्यक समन्वयक भीमराव आमटे, रश्मी होले, साक्षी काळे, प्रज्ञा पवार व सुमैया मिर्झा व सर्व टीम यांनी कठीण परिश्रम घेतले.



