ब्रेकिंग न्यूज… — कोणताही संबंध नसताना “आधार” संस्थेच्या खात्यावर वनविभागाचे लाखो रक्कम जमा…

   अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर

        “वर कमाई” साठी शिवणी वनपरिक्षेत्रात प्रकार घडला असल्याची गायकवाड यांची माहिती.

सिंदेवाही :- ताडोबा बफर मधील शिवणी वनपरिक्षेत्रातील नलेश्र्वर, कुकडहेटी, शिवणी, या उपवन क्षेत्रात लाखो रुपयांची हिवाळी व उन्हाळी कामे दाखवून सदर कामाची रक्कम वनविभागाशी कोणताही संबंध नसलेल्या वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या बँक खात्यात जमा करून ती रक्कम वर कमाई म्हणून वापरण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे.

             शिवणी वनपरिक्षेत्रातील काही उपवन क्षेत्रात मागील सन २०२०- २१ पासून रोपवन, वृक्षलागवड, सुरक्षा व संवर्धन, मचान, पाणवठे, आग नियंत्रण, राबजलाई, फायर लाईन, प्राणी गणना, गस्त, यासह इतर घटकांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान वनविभागाच्या प्रत्येक कामावर स्थानिक, व परिसरातील मजूर पुरविण्यात आले असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र कोणत्याही मजुरांचे नाव असलेले प्रमाणित हजेरी रजिस्टर दिसून आले नाही.

         वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा क्षेत्र सहाय्यक यांनी सदर कालावधीत कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर केला असल्याचे दाखवत असले, तरी स्थानिक मजुरव्यातिरिक्त बाहेरील कोणताच व्यक्ती कामावर हजर नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. असे असताना सुद्धा वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे त्या कामाशी “कनेक्शन” जोडून त्या संस्थेने मजूर पुरविले असल्याचे बोगस मजूर दाखवून संबधित कामांचा धनादेश वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या नावे दिला आहे.

          सदर संस्थेचा वनविभाग सोबत काहीच संबंध नसताना वरील नावाच्या संस्थेला धनादेश का देण्यात आला? याबाबत शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी सदर संस्थेची संपूर्ण माहिती प्राप्त केली असता केवळ आधार संस्थेच्या आणि तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे ” वर कमाई” साठी आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा केले असल्याचे दिसून आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी प्रसिध्दी माध्यमाना दिली आहे.