निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
टिळक विद्यालय, खंडाळा ता. साकोली येथील संस्थेचे संस्थापक स्व. वसंतरावजी पाटील लांजेवार यांची पुण्यतिथी नुकतीच अत्यंत श्रद्धापूर्वक आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मान्यवरांनी स्व. लांजेवार साहेबांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात स्थापित करण्यात आलेल्या वसंतराव पाटील यांच्या पुतळयाचे तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. सेवानिवृत्त शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून स्व. लांजेवार साहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री. डी. एल. लांजेवार सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एन. निर्वाण सर, तसेच श्री. डी. डी. तुमसरे सर, श्री.पी.एन. कापगते सर,श्री. ए. आर. कुंभरे सर, श्री. आर. एम. भेंडारकर सर, श्री.ए. पि. काशीवार सर आणि श्रीमती एम. यू. मेश्राम मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डी. डी. तुमसरे सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “वसंतराव पाटील लांजेवार साहेबांचे जीवन म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रज्वलित केलेली ज्ञानाची मशाल होती. त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत टिळक विद्यालयाची स्थापना केली आणि परिसरातील अनेक पिढ्यांसाठी शिक्षणाचे दालन उघडले. त्यांचे कार्य केवळ संस्था उभारण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा दिली. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीचे महत्त्व त्यांच्या कार्यातून दिसून येते. त्यांच्या आदर्श विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
तसेच मुख्याध्यापक श्री. ए. एन. निर्वाण सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “संस्थापक स्वर्गीय वसंतराव पाटील लांजेवार साहेबांचे शैक्षणिक ध्येय आणि दूरदृष्टी खूप मोठी होती. आज टिळक विद्यालय ज्या उंचीवर आहे, त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि त्यागाला जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच तत्पर असत. त्यांचे हे स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यांचे आदर्श घेऊनच आम्ही विद्यालयाला अधिक प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यांच्या स्मृतीदिनी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या महान कार्याला वंदन केले, हे पाहून खूप समाधान वाटले.”
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन श्री. ए. आर. कुंभरे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एम यु मेश्राम मॅडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शालेय कर्मचारी सुनील मेंढे, डी.एम. रोकडे इत्यादी कर्मचारी यांनी सहकार्य केले.



