दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व स्वयंपाकासाठी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला असून तो २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. या मोठ्या गर्दीमुळे नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, नदीचे पाणी भांडी घासणे वा तत्सम इतर कामांसाठी वापरता येईल, मात्र पिण्यास व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई असेल.
नदीच्या पात्रात कपडे धुणे, आंघोळ करणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करु नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी व वारकऱ्यांनी सार्वजनिक नळांवरील शुद्ध पिण्याचे पाणी वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३१ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डूडी यांनी दिला आहे. प्रशासनाने वारकरी व नागरिकांना सहकार्य आवाहन करताना इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.



