ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- संपूर्ण राज्यातील जिल्हा हिवताप अधिकारी अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांचे आठ महिन्यापासून रखडलेले मानधन त्वरित देण्यात यावे यासाठी आजाद समाज पार्टी च्या वतीने जिल्हा हिवताप अधिकारी व mail द्वारा आरोग्य विभाग राज्य सचिव यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील हिवताप विभागातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील रिक्त जागांवर आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदावर शासनाने आठ महिन्यांपूर्वी एकत्रित मानधन तत्वावर हिवताप विभाग(राज्यक्षेत्र) व जिल्हा परिषद स्थानिक विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, परंतु या नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचे सुरवातीपासूनच म्हणजे आठ महिन्याचे मानधन अदा झाले नाही.
यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषद स्थानिक विभागात संबंधित कर्मचाऱ्यांचे शासनाकडून नुकतेच अनुदान प्राप्त झाले परंतु राज्यातील हिवताप विभागातील (राज्य क्षेत्र) आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानधनासाठी अनुदान प्राप्त झालेले नाही.
राज्य सरकार एकीकडे राजकीय स्वार्थापोटी व भुलथापा मारण्यासाठी लाडक्या बहिणी सारख्या योजनांच्या नावाखाली काम न देता पैसा देतो आणि दुसरीकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8-8 महिन्यापासून मानधन थकीत ठेवतो. असला बोगस काम सोडून अशाप्रकारच्या फुकट पैसे वाटण्याच्या योजना बंद करुन लाडक्या बहिणींच्या पोरांच्या हाताला काम द्यावे आणि त्याना व्यवस्थित मोबदला द्यावा अशी मागणी आजाद समाज पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे.
कंत्राटी कर्मचारी, कामगार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, रोजगार सेवक अशा काम करणाऱ्या लोकांना योग्य तो मोबदला आधी द्यावा आणि नंतर राजकीय योजना वाटत बसावे.
गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा असून दुर्गम भागात अनेक अडचणींना तोंड देत कर्मचारी आपली जबाबदरी पार पाडत आहेत परंतु शासन त्याना मानधनापासून वंचित ठेवून एक प्रकारची त्यांची अवहेलना करत असून हा मोठा अन्याय आहे.
त्यामुळे राज्यातील हिवताप विभाग अनुसूचित क्षेत्रात (पेसा) कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदावर कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत आठ महिन्याचे मानधन त्वरित व एकरकमी देण्यात यावे ही मागणी email द्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सेक्रेटरी डॉ. निपुण विनायक यांचेकडे केली असल्याचे राज बन्सोड जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी गडचिरोली यांनी म्हटले आहे.



