Home Political आळंदीत सुखदुःखाच्या प्रसंगीही निवडणुकीचीच चर्चा..!  — राजकारणाने व्यापले दैनंदिन जीवन; प्रत्येक...

आळंदीत सुखदुःखाच्या प्रसंगीही निवडणुकीचीच चर्चा..!  — राजकारणाने व्यापले दैनंदिन जीवन; प्रत्येक कार्यक्रम निवडणुकी केंद्रित…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी‌ : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीचा ताप आता इतका वाढला आहे की, शहरातील सुखदुःखाच्या प्रसंगी सुद्धा निवडणुकीचीच चर्चा होताना दिसते. लग्न, नामकरण, अंत्यसंस्कार, धार्मिक कार्यक्रम — कोणताही प्रसंग असो, लोकांच्या चर्चेचा विषय आता एकच ठरला आहे, “यंदा कोण जिंकणार?”

          शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, प्रत्येक हॉटेल, वाड्यात, गल्लीबोळात आणि चौकात फक्त उमेदवारांची चर्चा रंगलेली आहे. इतकेच नव्हे, तर सामाजिक कार्यक्रमांनाही आता राजकीय रंग चढू लागला आहे. अनेक इच्छुक उमेदवार हे या कार्यक्रमांमध्ये ‘सामाजिक संवाद’ या नावाखाली हजेरी लावत असून, आपली उपस्थिती दाखवण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.

         स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, “कोणाचंही लग्न असो किंवा दुःखाचा प्रसंग — लोक विचारपूस करण्याआधी विचारतात, ‘तुमचा उमेदवार कोण?’ किंवा ‘तुमचं मत कुणाला?’” त्यामुळे राजकारणाने आळंदीच्या सामाजिक जीवनात घट्ट पाय रोवले आहेत.

          दरम्यान, राजकीय विश्लेषकांच्या मते, “आळंदीतील ही निवडणूक केवळ सत्तासंघर्ष न राहता आता ती समाजातील प्रत्येक संवादाचा केंद्रबिंदू बनली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असलेल्या आळंदीत राजकीय चर्चा इतक्या जोमात रंगताना प्रथमच दिसत आहेत.”

        आळंदीच्या वातावरणात भक्ती, राजकारण आणि चर्चा यांचा अनोखा संगम पाहायला मिळत असून, सर्वत्र एकच प्रश्न घुमत आहे —‌ “यंदा नगराध्यक्षपदी बसणार कोण..?”