अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती – सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या ११ मित्र आणि नातेवाईकांच्या डबापार्टीवर निसर्गाचा कोप झाला. मौजा घातखेडा येथील तलावात बुडून एकाच परिसरातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. मृतांमध्ये सख्या बहीण-भावाचा समावेश असल्याने खोलापुरी गेटमधील महाजनपुरा परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, खोलापुरी गेट परिसरातील ११ जण रविवारी सुट्टीनिमित्त माडी रोडवरील डॉ. गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या घातखेडा तलाव परिसरात डबापार्टीसाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवण आटोपल्यावर सोनाली जोशी ही तलावात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी तिचा भाऊ आदित्य, मैत्रीण पायल आणि मित्र यश यांनी तलावात उड्या घेतल्या. मात्र, तलावातील गाळात अडकल्याने या चौघांचाही दुर्दैवी अंत झाला.

मृतांची नावे…
१) सोनाली नरेंद्र जोशी (१६)
२) आदित्य नरेंद्र जोशी (१२) (दोन्ही सखे बहीण-भाऊ)
३) पायल बबलू पंडित (१४/२१)
४) यश गजानन काकणे (१३)
(सर्व रा. महाजनपुरा, खोलापुरी गेट, अमरावती)
पोलिसांची धाव…
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन श्रीसाठ आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाच्या साहाय्याने गाळात फसलेल्या चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात हळहळ व्यक्त होत असून महाजनपुरा भागात दुःखाचे डोंगर कोसळले आहे.



