ऋषी सहारे
संपादक
ब्रम्हपुरी :- सरकारने गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी ‘घरकुल योजना’ राबवली खरी, मात्र त्याचे अनुदान देताना शासनस्तरावर होत असलेल्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना आता मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील तब्बल १६६ लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या ४ वर्षांपासून रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थी दिनांक ९ एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक देत दांडेकर उपजिल्हाधिकारी (रोहयो)व पुलकित सिंह मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
कर्जबाजारी होण्याची वेळ…
सन २०२१ पासून आवळगाव येथील या १६६ कुटुंबांना घरकुल मंजूर झाले. अनेकांनी आपल्या घरांची कामे पूर्णही केली आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी उसने-वारी करून, व्याजाने पैसे काढून किंवा सिमेंट-लोखंडाची उधारी करून घराचे बांधकाम पूर्ण केले. “शासनाचे हप्ते जमा झाले की उधारी फेडू,” या आशेवर असलेल्या या गरिबांना २०२१ पासून अद्याप थकीत रक्कम मिळालेली नाही. परिणामी, हे सर्व लाभार्थी सध्या मोठ्या आर्थिक विवंचनेत आहेत.
वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष…
संबंधित विभागाकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली, तक्रारी करण्यात आल्या; मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. १६६ लाभार्थ्यांचे हक्काचे पैसे का रखडले? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
आंदोलनाचा एल्गार…
लाभार्थ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी शेतकरी नेते कॉ. विनोद झोडगे यांनी आवळगाव येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व घरकुल धारकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात कॉ. झोडगे यांनी आक्रमक भूमिका घेत लाभार्थ्यांसह ग्रामपंचायत व पंचायत समिती समोर निदर्शने केली होती.
सरकारने गरिबांची थट्टा थांबवावी…
जर १६७६ लाभार्थ्यांची थकीत रक्कम त्वरित दिली नाही, तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा कॉ. विनोद झोडगे यांनी प्रशासनाला दिला आहे.यावेळी घरकुल लाभार्थी शशिकांत वार्जुकर,खेमराज उरकूडे, महेश दूमाने,संकेत चौधरी यासह अन्य लाभार्थी उपस्थित होते.



