आळंदीचे पं.कल्याणजी गायकवाड यांना शासनाचा कंठ संगीतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा मानाचा कंठ संगीत या क्षेत्रासाठी सन २०२१ करिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक पंडित कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील कलांगण येथे प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपिस्थत होते. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंतांना आज सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

 

पं.कल्याणजी गायकवाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नसून वारकरी संप्रदायातील संगीत साधना करणार्‍या तमाम संगीत साधकांचा आहे, ही केवळ पांडुरंगाची, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज व माझे प्रथम गुरू हभप मच्छींद्र महाराज गोधे,

वै.गुरूवर्य हभप जयराम महाराज भोसले, हभप गुरूवर्य मारूती बाबा कुर्‍हेकर, गुरूवर्य पंडित रघुनाथजी खंडाळकर व गुरूवर्य पंडित अजयजी पोहनकर तसेच महाराष्ट्रातील तमाम संगीत रसिक यांची कृपा आहे. महाराष्ट्र शासनाने हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले त्या बद्दल 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर जी मुनगंटीवार, सांस्कृतिक संचालनालय मंत्रालय मुंबई संचालक बिभीषण चौरे व पुरस्कार निवड समिती या सर्वांचे मनापासून आभारी आहे.