शरद पवारांचा मोदी,भाजपावर हल्लाबोल.. — पंडित जवाहरलाल नेहरू वर टिका करुन काय साध्य होणार आहे.. — ईडी विरोधकांना परेशान करणारे ठरले हत्यार.

(वृत्त संस्था)

पुणे :-

      नेहरुंनी लोकशाही रुजवली, लोकशाहीचं शासन दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी यांनी केले. मला समजत नाही की त्याने काय साध्य होणार आहे, असे शरद पवार म्हणाले

      राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका केली. भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.अगोदर लोकांना ईडी काय आहे,हे माहिती नव्हते. 

         भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली.यात एक मुख्यमंत्री,एक माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांतील १४ मंत्री, २४ खासदार,२१ आमदार,७ माजी खासदार यांचा समावेश आहे,याचा काय अर्थ काढायचा? असा सवाल शरद पवार यांनी केला. 

         ते आज (११ फेब्रुवारी २०२४) पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

**

   व्यक्तिगत हल्ले करून काय साध्य होणार – शरद पवार

    “आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत.केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपाच्या हातात आहे.त्यांची धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणारी आहेत.या धोरणांचा पुरस्कार त्यांच्याकडून केला जातो. 

        काल लोकसभेचं कामकाज संपलं.पंतप्रधानांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला समजेल की त्यांनी काहीही विधायक सांगितले नाही.दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत भाषण केले होते.त्यावेळीही त्यांनी इंदिरा गांधी,जवाहरलाल नेहरू यांचं राहणं यावरच भाष्य केलं.नेहरुंनी लोकशाही रुजवली,लोकशाहीचं शासन दिलं,त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी यांनी केले.मला समजत नाही की त्याने काय साध्य होणार आहे. 

         ज्यांनी देशाला दिशा दिली,देशासाठी कष्ट केले त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही,” असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

**

१८ वर्षांत १४७ नेत्यांची चौकशी, ८५ टक्के विरोधी पक्षातील नेते- शरद पवार

     “सत्तेचा गैरवापर केला जात आहे.आज भाजपाच्या विचाराच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाते.

     अगोदर लोकांना ईडी हा शब्द माहीत नव्हता. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.मी येताना माहिती घेतली की, ईडीचा गैरवापर फार झाला.२००५ ते २०२३ या १८ वर्षांच्या कालावधीत ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली.चौकशी केल्यानंतर सत्यावर आधारित फक्त २५ खटले निघले.त्या २५ खटल्यांपैकी फक्त दोघांना शिक्षा झाली.

         या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले.हे करत असताना ईडी कोणाच्या मागे लागली.गेल्या १८ वर्षांत १४७ नेत्यांची चौकशी झाली.त्यात ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षाचे होते.भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली.यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांच्यावर कारवाई करण्यात आली,” अशी आकडेवारी शरद पवार यांनी सादर केली.तसेच यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव नाही. 

         भाजपाच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबवण्यात आली.याचा अर्थ काय काढायचा? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

**

अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती..

      शेवटी बोलताना या सर्वाविरोधात लोकांच्या मनात जनमत तयार करावे लागेल. काही लोक आपल्याला सोडून गेले.विकासासाठी आम्ही गेलो, असे ते सांगत आहेत.गंमतच आहे. 

       संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाला काही महत्त्व असते की नाही? असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली.