स्वामी विवेकानंदांचे विचार तळागाळात पोहचविण्याची गरज.:- ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे… — स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीने पुण्यात विश्वबंधुत्व दिनानिमित्त चारुदत्त आफळे यांचे व्याख्यान…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

पुणे : विश्वबंधुत्व दिनानिमित्त’ विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’च्या पुणे शाखेने ‘विश्व कल्याणासाठी विश्वगुरू भारत ‘ या विषयावर ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. हे व्याख्यान केतकर सभागृह (मुक्तांगण इंग्लिश स्कुल,अरण्येश्वर) येथे झाले. ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखेचे संचालक जयंत कुलकर्णी, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत व्यवस्था प्रमुख विनायक कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विवेकानंद केंद्र प्रकाशन विभागाच्या ‘शौर्य कथा -भाग ४’,’सर्वस्पर्शी विवेकानंद’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील व्याख्यानात ‘माझ्या भगिनी आणि बंधूनो’ या शब्दांनी संपूर्ण विश्वातील मानवतेला साद घातली होती. हा दिवस विवेकानंद केंद्रामध्ये ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांचा एक भाग म्हणून विश्व बंधुत्व दिनाच्या पूर्व संध्येला हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

          चारुदत्त आफळे म्हणाले,’स्वामीजींनी मुर्ती पुजेचे स्तोम माजवले नाही, पण मानवतेकडे दुर्लक्ष करू नये, हे सांगितले आहे. स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार महत्वाचे आहेत. मुर्तीना नटविण्यासाठी खर्च केला जातो, मात्र मानवता वादी कार्याना निधी कमी पडतो.त्यामुळे स्वामी विवेकानंदांचे विचार आणखी तळागाळात पोहचविण्याची गरज आहे.

         विश्वगुरू होताना आपल्या आचरणाकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ व्हॉट्स अप, फेसबुक मध्ये गुरफटून चालणार नाही. विवेकानंद केंद्र प्रेरित युवा वर्ग उभे करीत आहे, ही मोठी गोष्ट आहे. संकुचित पणा, धर्मांधता मुळे मानवतेचे नुकसान झाले आहे, असे विवेकानंद यांनी सांगितले. मात्र, धर्माचा अभिमान बाळगू नये, असे विवेकानंद यांनी सांगितलेले नाही. साधना, सेवा, संघटन, संघर्ष हाच मार्ग विवेकानंद केंद्राने अंगिकारला आहे. भारताला विश्व गुरू करण्यासाठी पंच तत्वाचे स्मरण केले पाहिजे. सचोटी, बंधुत्व बाळगले पाहिजे. भारत विश्र्वगुरू करण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यात प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे,असे प्रतिपादन आफळे यांनी यावेळी बोलताना केले.