ऋषी सहारे
संपादक
ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या धानाची विक्री होऊनही केवळ ‘उद्दिष्ट’ संपल्याच्या तांत्रिक कारणामुळे चुकारे रखडले आहेत. हा अन्नदात्याचा छळ असून, येत्या आठवडाभरात धान खरेदीची मर्यादा वाढवून न दिल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा लढाऊ शेतकरी नेते कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे. गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
खरेदी होऊनही ‘बिलिंग’ ठप्प…
तालुक्यातील मुडझा, आवळगाव, हळदा, वांद्रा, बरडकिन्ही आणि गांगलवाडी परिसरातील सेवा सहकारी संस्थांच्या केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. मात्र, शासनाचे उद्दिष्ट संपल्यामुळे गेल्या ३-४ महिन्यांपासून या धानाची ऑनलाईन ‘बिलिंग’ झालेली नाही.
कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा…
धानाचे चुकारे वेळेवर मिळतील या आशेवर शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. मात्र, पैसे न मिळाल्याने कर्जाची परतफेड रखडली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
प्रशासनाशी थेट चर्चा….
कॉ. विनोद झोडगे यांनी निवेदन सादर करतानाच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि तालुक्यातील विदारक स्थिती मांडून तातडीने मर्यादा वाढवण्याची मागणी केली तेव्हा लवकरच कलेक्टर ऑफिसला बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकरी नेत्यांचा आक्रमक पवित्रा…
जर ७ दिवसांच्या आत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर भाकपच्या वतीने शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या हक्काचा लढा लढतील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ रवींद्र उमाटे,सहसचिव कॉ.राजू गयनेवार ,किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉ.प्रा.नामदेव कनाके, शशिकांत वार्जुकर,महेश दूमाने, खेमराज उरकूडे,संकेत चौधरी यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.



