दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्याची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने शनिवार, ३ मे ते शनिवार, १० मे, या कालावधीत जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठवले आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण, अद्याप तारीख, वेळ निश्चित झालेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख आणि वेळ निश्चिती होईल. त्यानंतर अधिकृतपणे कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाईल असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी सांगितले आहे.



