Home देशविदेश ‘अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे!’ :- भगवान महावीर…

‘अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे!’ :- भगवान महावीर…

  दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

               वृत्त संपादिका 

             ज्या काळात समाजात सगळीकडे अराजकाचे साम्राज्य पसरलेले होते, मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रात वैचारिक, सामाजिक अस्थिरता होती. पराकोटीची विषमता होती. वर्णव्यवस्थेतील सर्वश्रेष्ठ लोक स्वतःचा स्वार्थ साधून सर्वसामान्य लोकांना लुबाडत होते.

          कर्मकांडाच्या रूढी-परंपरांमध्ये अडकवून त्यांची फसवणूक करत होते, शोषण करत होते, छळत होते. अशा अराजकतेच्या, शोषण व्यवस्थेच्या काळात सुमारे २६०० वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व ५९९ मध्ये भगवान महावीर यांचा जन्म झाला. 

         अज्ञानामुळे, कर्मकांडांमुळे, दुःख-दारिद्र्यामुळे गलितगात्र झालेल्या समाजाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, समाजातील सर्वसामान्य लोकांच्या उत्थानासाठी भगवान महावीरांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचे कार्य हाती घेतले आणि जैन धर्माचा उदय झाला. 

        अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांच्याही आधी भगवान महावीरांनी वेद नाकारून सनातन, वैदिक धर्माला प्रचंड तडाखा दिला. भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पंचशील अखिल विश्वाला दिलेले वरदान आहे!

         हिंसेच्या मार्गाने जगात शांतता कधीच निर्माण करता आली नाही आणि करता येणार नाही. ‘अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे!’ हा संदेश सर्वप्रथम भगवान महावीरांनी सुमारे सव्वीसशे वर्षांपूर्वी जगाला दिला. त्यांचा हा संदेश आजच्या काळातही तितकाच उपयुक्त आहे.

            त्याचप्रमाणे भगवान महावीरांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ‘जगा आणि जगू द्या!’ हा नारा जगाला दिला. ‘जगा आणि जगू द्या’ या चार शब्दाने अखिल मानवी समाजाचे कल्याण साधता येणार आहे!