Home देशविदेश काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त…. — त्या...

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त…. — त्या त्यागी व प्रगल्भ नेत्या!

दखल न्युज भारत…

       भारताच्या राजकीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे केवळ सत्ता, यश किंवा पदांनी नव्हे तर आपल्या वृत्तीने,संयमाने आणि मूल्यांनी लोकांच्या मनात घर करतात.सोनिया गांधी हे त्यापैकी सर्वोत्कृष्ट उदाहरण आहेत.

    सोनिया गांधी… हे केवळ एक नाव नाही,तर ते त्याग,शालीनता आणि दुर्दम्य संयमाचे मूर्तिमंत प्रतीक आहे.कित्येक दशके चाललेल्या अत्यंत खालच्या पातळीच्या,गलिच्छ टीकेला,वैयक्तिक हल्ल्यांना आणि चारित्र्यहननाला न जुमानता,त्यांनी भारतीय राजकारणात एक अभूतपूर्व स्थान निर्माण केले आहे.

      सतत उठणारी “विदेशी” ही टीका अनेकदा राजकीय विरोधाच्या मर्यादेपलीकडे गेली,पण त्या कधीही डगमगल्या नाहीत.त्यांनी कधीही द्वेषाची भाषा स्वीकारली नाही किंवा रागाचा,प्रतिशोधाचा मार्ग निवडला नाही.हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वात मोठं बळ ठरतं.त्यांच्यावर होणारी टीका ही केवळ एका व्यक्तीवरची टीका नसून,ती एका अशा स्त्रीच्या कर्तृत्वामुळे दुखावलेल्या पुरुषी अहंकाराचे प्रतिबिंब आहे,जिने बाहेरून येऊन या भूमीला,इथल्या संस्कृतीला आणि भाषेला आपलेसे केले.

      माजी प्रधानमंत्री असलेल्या स्व.इंदीरा गांधी या सासूची निर्घृण हत्या,माजी प्रधानमंत्री पती राजीव गांधींची हत्या,कुटुंबावर ओढवलेली ही संकटे,राजकीय वादळं यानंतरही त्या खंबीर उभ्या राहिल्या.ज्यांची सुन आणि पत्नी म्हणून त्या या देशात आल्या त्यांनाच गमवावे लागते,त्या घरातलं दुःख कोणत्याही सामान्य कुटुंबापेक्षा हजारपट तीव्र असतं.पण सोनिया गांधींनी त्या वेदनेला किंकाळी बनू दिलं नाही; त्यांनी त्या परिस्थितीला देशाची सेवा करण्याचं कारण बनवलं.

     भारतातील राजकारणात पुरुषप्रधानता ही उघडी वस्तुस्थिती आहे.अशा वातावरणात बाहेरून आलेली एक स्त्री पक्षाचं नेतृत्व करते, दशकभरापेक्षा जास्त काळ सत्ता स्थिर ठेवते,लोकशाहीतील महत्त्वाची पायाभूत कल्याणकारी धोरणं पुढे नेते, ही गोष्ट स्वतःमध्येच असामान्य आहे.

      प्रधानमंत्री बनण्याची संधी त्यांच्या हातात होती.सत्ता त्यांच्या दारात उभी होती.पण त्यांनी बाजूला होणं पसंत केलं.जगात अत्यंत दुर्मीळ असणारा असा सत्तेचा त्याग त्यांच्या नावावर कायमचा कोरला गेला.

    आज राहुल गांधी देशभरातील लोकांमध्ये मिसळतात,संघर्ष करतात,लोकांच्या वेदना समजून घेतात,प्रियंका गांधी ग्रामीण स्त्रियांशी सहजपणे एकरूप होतात,हे फक्त त्यांचं नेतृत्व नाही,ही सोनिया गांधींच्या शांत,प्रगल्भ आणि मानवतावादी संस्कारांची देण आहे.

     त्या अलंकारिक भाषणं देणाऱ्या नेत्या नाहीत,त्या रणभूमीतील तलवार उचलणाऱ्या योद्ध्या नाहीत,त्या छाती ठोकून लोकप्रियतेचा शोध घेणाऱ्या राजकारणीही नाहीत.त्या एक समर्पित स्त्री आहेत,ज्यांनी आयुष्यभर गोंगाट टाळला आणि इतिहासाला स्वतःचं महत्त्व सांगू दिलं.

      सोनिया गांधींवर कितीही टीका झाली,कितीही अपमान झाला,तरी त्यांनी कधी भारताला परकं मानलं नाही.त्यांनी या देशाला आपलं मानलं,आपल्या कुटुंबासारखं मानलं.त्यांच्या शांत धैर्याने,संयमाने आणि तत्त्वनिष्ठ कामगिरीने भारतीय लोकशाहीला एक गंभीर,संयमी आणि प्रगल्भ परंपरा दिली.