माणसाची इच्छा असो की नसो तो जन्माला येतो आणि मरायची इच्छा नसते म्हणून तो आयुष्यभर जिवंत राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करीत असतो, जीवन जगण्याचे रहाटगाडगे चालत असताना काहीतरी कारणाने त्याचा मृत्यू होतो. हे नित्याचेच आहे.
परंतु आपण जन्मास का आलोत त्याचा काय हेतू असला पाहिजे? जीवन कसे जगले पाहिजे ? जीवनाचा अर्थ काय ? सुखी जीवन म्हणजे काय आणि दुःखी जीवन म्हणजे काय ? सुखी जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे ? ते कसे केले पाहिजे ? याचा विचार करणारे लोक फारच कमी, याशिवाय स्वतःच्या विचाराशिवाय दुसऱ्याचा विचार करणारे म्हणजे महापुरुष महामानव किंवा संत त्यांचे जगणे त्यांचे राहणे त्यांच्या जगण्याचा अर्थ उद्देश सगळा काही सामान्य माणसापेक्षा वेगळाच असतो. महामानवा सारखे जगणे किंवा त्यांच्यासारखे विचार करणे सामान्य माणसाला जरी शक्य नसले तरी किमान आपण का जगले पाहिजे आणि कसे जगले पाहिजे ? त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला पाहिजे ? योग्य आणि अयोग्य साध्य आणि साधन म्हणजे काय ती कोणती ? किमान एवढा तरी विचार सामान्य माणूस करू शकतो, पण तसे करीत नाही, म्हणून आपण कुठून आलोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे कसे जायचे आहे कोण्या साधनाद्वारे जायचे आहे इत्यादी काहीच माहिती नसते, केवळ मरता येत नाही किंवा मरायची इच्छा होत नाही म्हणून जगायचे असते एवढेच काय ते. अशा विचाराने जगणारी माणसे म्हणजे दिशाहीन माणसे ध्येयही न माणसे होत आणि अशाच माणसांची संख्या भरपूर आहे, याला म्हणतात मेंढरां चे जीवन. बुद्धीहीन जीवन. खरे तर माणूस हा प्राणी पशुपक्षी आणि वनस्पती पेक्षा वेगळा आहे कारण त्याला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीला मर्यादा नाही म्हणजे तो काहीही कसेही कुठेही विचार करू शकतो आणि त्यातून आपली प्रगती अधोगती करू शकतो.
माणूस जगत असताना जर तो विचारहीन जगत असेल तर त्याला काही अर्थ नाही, अशा जीवनास किंवा जिंदगीस निरर्थक जीवन असे म्हणतात. असा माणूस आला तसा गेला, यापेक्षा वेगळे काही म्हणता येत नाही.
खरे तर माणसाने जन्मास येऊन काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे, भव्य दिव्य असे जरी आपल्या हातून होऊ शकले नाही तरी किमान आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले पाहिजे आणि त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी कोण्या मार्गाने जायचे तो मार्ग किंवा साधन निश्चित करणे गरजेचे आहे, या पद्धतीने जीवनक्रम करणारा माणूस म्हणजेच साधक होय. ज्याला काही ध्येय आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी काही निश्चित साधन केले आहे असे जीवन जगणारा माणूस म्हणजेच साधक होय. याचा अर्थ साध्य साधन आणि साधक याची सांगड बसणे किंवा घ**** महत्त्वाचे आहे, अशी सांगड घालून जीवन जगणे म्हणजे ते जीवन सार्थकी लागणे होय. निरर्थक जीवनास किंवा काहीच अर्थ नाही. माणसाच्या जन्मास येऊन त्याच्यापुढे काही ध्येय नसेल काही स्वप्न नसेल काही विचार नसतील तर असे विचारहीन जीवन जगणे म्हणजे भरकटलेले जीवन होय, यालाच निरर्थक जीवन असे म्हणतात.
जीवनी दोन प्रकारचे जगले पाहिजे, एक म्हणजे स्वतःसाठी जगायचे आणि दुसरे म्हणजे इतरांसाठी जगायचं, याचा अर्थ संसार करून परमार्थ साधायचा, यालाच पुरुषार्थ म्हणतात, असे जीवन जगणे म्हणजे उच्च जीवन होय. केवळ स्वतःसाठीच जीवन जगणे म्हणजे नीच जीवन जगणे होय. स्वतःसाठी जगणारे सगळेच आहेत परंतु इतरांसाठी जगणारे फार कमी आहेत, किंवा किमान स्वतःसाठी जगत असताना त्यासोबतच इतरांसाठी पण जगावे अशी कृती करावी अशा प्रकारचे पण जीवन जगता येते आणि तेही योग्यच आहे परंतु असेही म्हणजे असल्या प्रकारचे जेवण जगताना लोक दिसत नाहीत,
जन्मास यावे, आई-वडिलांच्या जीवावर किंवा मेहरबानीने लहानाचे मोठे व्हावे, कमाई करावी, आणि कमवलेली सारी संपत्ती इथेच सोडून जावी, यापेक्षा माणूस वेगळे काही करत नाही, अर्थात हे करणे चुकीचे आहे असे माझे म्हणणे नाही, परंतु हे करत असताना प्रत्येक माणसापुढे काहीतरी ध्येय असले पाहिजे, ते म्हणजे स्वतःसाठीची ध्येय आणि दुसऱ्यासाठीचे ध्येय निश्चित केले पाहिजे. स्वतःसाठीचे ध्येय म्हणजे कोणत्याही मार्गाने कसेही म्हणजे वाईट मार्गाने सुद्धा संपत्ती जमा करायची आणि ती कशीही खर्च करायची अशा प्रकारची ध्येय होऊ शकत नाही आणि होऊ नये, तर आपले जीवन सुखी करण्यासाठी चांगल्या मार्गाने संपत्ती जमवावी आणि ती संपत्ती चांगल्या कामासाठीच उपयोगात आणावी यामध्ये समाज देश आणि दुर्बल घटकांचा पण विचार झाला पाहिजे, देशाचे सरकार कशी असले पाहिजे ? देशाची आर्थिक सामाजिक व्यवस्था कशी असली पाहिजे ? की ज्यामुळे आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय समस्या निर्माण होणार नाहीत, अशा प्रकारचा विचार घेऊन जीवन जगणे म्हणजे एखाद्यासाठी जगलेले ते जीवन होय,
खरे तर वैयक्तिक जीवनाचा विचार केल्यानंतर आपल्या खाजगी जीवनाचे ध्येय हे सुख शांती आनंद आणि समाधान हेच असते, पण हे खाजगी किंवा वैयक्तिक ध्येय बहुतांशी प्रत्येक माणसाला शक्य होत नाही, अशी का घडते ? याचा पण विचार करीत जीवन जगणे म्हणजे तो सुद्धा एक पुरुषार्थच आहे. तसेच समाजात आणि देशात सुख शांती सुरक्षितता आनंद आहे का ? सारा देश सुखी आणि संपन्न आहे का ? नसेल तर तसा तो झाला पाहिजे , यासाठी प्रत्येक माणसाचे योगदान महत्त्वाचे असते, हे योगदान देण्याचा संकल्प म्हणजेच माणसाचे ध्येय होऊ शकते, परंतु असे ध्येय उरी बाळगून जगणारी माणसे फारच कमी आहेत, म्हणून तर गरिबी महागाई बेकारी नफेखोरी पिळवणूक सोशल विषमता नशाबाजी जुगार अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, याचे मूळच आहे की, येथील सामान्य माणसाला ध्येय नाही, आता ध्येय नाही म्हटल्यानंतर त्याला दिशा कशी मिळणार ? आणि दिशाच नसेल तर साधनांचा तो विचार तरी कसा करणार ? यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचे खाजगी आणि सामाजिक ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी योग्य त्या साधनांची पण निवड केली पाहिजे तरच तो साधक म्हणून घेऊ शकतो.
अशाप्रकारे साध्य साधन आणि साधक या तीन गोष्टीची जर लिंक लागली तर देशात परिवर्तन किंवा क्रांती किंवा समृद्धी विकास व्हायला 77 वर्ष लागणार नाहीत.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 9 डिसेंबर 2025. फोन : 9420912209.


