दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच सोशल मीडियावर उमेदवारांची चुरस रंगू लागली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) अशा माध्यमांवर संभाव्य उमेदवारांचे पोस्ट, शुभेच्छा बॅनर, वाढदिवसाच्या जाहिराती आणि विविध सामाजिक उपक्रमांचे फोटो मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीची चाहूल सोशल मीडियावरूनच लागल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील सर्वच प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार आता जनतेशी संवाद साधण्यासाठी डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. “शहराच्या विकासासाठी तुमचा आशीर्वाद हवा”, “युवकांच्या विश्वासाची ताकद”, “सेवेसाठी तत्पर” अशा घोषवाक्यांसह उमेदवार आपली प्रतिमा तयार करताना दिसत आहेत. काही ठिकाणी समर्थकांकडून ‘भावी नगरसेवक’ अशा शुभेच्छा पोस्टसुद्धा व्हायरल होत आहेत.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया हे स्थानिक निवडणुकांमधील एक प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे पारंपरिक प्रचाराबरोबरच आता डिजिटल प्रचारालाही महत्त्व आले आहे. खासकरून तरुण उमेदवार आपल्या कामांची माहिती आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी reels, short videos आणि live सत्रांचा वापर करत आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोशल मीडियावरील पोस्ट आणि जाहिरातींवरही लक्ष ठेवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सध्या जरी सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण असले, तरी आचारसंहिता लागू झाल्यावर प्रचाराची दिशा आणि रंगत बदलण्याची शक्यता आहे.आळंदीतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापण असून सोशल मीडियावर उमेदवारांची ही “डिजिटल जत्रा”च शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.



