Home सांस्कृतिक संत मुक्ताईची राखी लाडक्या ज्ञानदादाच्या चरणी अर्पण…

संत मुक्ताईची राखी लाडक्या ज्ञानदादाच्या चरणी अर्पण…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

आळंदी :- संपूर्ण जगाला मानवतावादाचा संदेश देणाऱ्या लहानग्या भगिनीचे बंधूप्रेम आजही जपण्याचे कार्य श्रीक्षेत्र मेहूण येथील देवस्थानाकडून सातत्याने करण्यात येत आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या हस्ते तयार करण्यात आलेली पवित्र राखी श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्वर आणि सासवड या तिन्ही ठिकाणी पाठविण्यात आली.

        आळंदी येथे संत मुक्ताईंची राखी ज्ञानदादाच्या समाधीस्थळी भक्तिभावाने अर्पण करण्यात आली. संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त यांनी सपत्नीक माऊलींना पूजा-अभिषेक करून मुक्ताईची राखी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस अर्पण केली.

        यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील, सम्राट पाटील, प्रतिभा पाटील, मीनाताई पाटील, संदीप भुसे, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, हभप विचारसागर महाराज लाहूडकर, संदीप पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने ज्ञानदादाकडून आदिशक्ती मुक्ताबाईस साडी-चोळी भेट देण्यात आली, अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.